नगर: आज कालच्या आधुनिक युगामध्ये सर्व प्रकारच्या शिक्षणाला आत्मसात करून परंपरा जपत महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सक्षम होणे गरजेचे आहे. रूढी व परंपरा व बुरसटलेले विचार बाजूला सारून समाजासाठी आपले गुणवत्तापूर्ण योगदान देणे गरजेचे आहे. महिलांनी प्रत्येक कालखंडात त्रास सहन केलेला आहे. परंतु, त्याचा बाऊ न करता स्वतः मजबूत होऊन पुढे येण्याचा काळ आता सुरू झालेला आहे, असे प्रतिपादन पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महापौर ज्योती गाडे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पोपेरे बोलत होत्या. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, उद्योजक राजेंद्र चोपडा, नगरसेवक अविनाश घुले, बाळासाहेब पवार, ऋग्वेद गंधे आदी उपस्थित होते.
महापौर ज्योती गाडे म्हणाल्या की, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवंत महिला, माताभगिनी अहिल्यानगरची सेवा करत आहे. महिला महापौर असताना महिलांचा सन्मान होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र, मोफत प्रसुती करणाऱ्या डॉक्टरपासून तर थेट अमरधाममध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला माता भगिनींचा होणारा सन्मान ही महिला दिनाच्या निमित्ताने महत्त्वाची गोष्ट आहे.
आयुक्त यशवंत यशवंत डांगे म्हणाले की, भारताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान आता पुरुषांच्या बरोबरीने होत आहे. नवनवीन कौशल्ये आत्मसात करून राज्याच्या व जिल्ह्याच्या प्रत्येक आघाडीवर महिला हिरीरीने पुढे येत आहेत. तरीही काही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात सक्षमता व सबलीकरण होणे निश्चितच गरजेचे आहे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. शेखर देशपांडे यांनी आभार मानले.
देशाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे: आ. जगताप
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर असो की भारताचे राष्ट्रपती पद, महिलांचे योगदान या देशासाठी अनन्यसाधारण आहे. खरंतर 365 दिवस महिलांचेच असतात. स्वतःची कौशल्य, शिस्त आणि टापटीपपणा या माध्यमातून महिला आता जगावर राज्य करण्यासाठी सिद्ध झालेल्या आहेत.
कर्तबगार महिलांचा सन्मान
वैशाली चोपडा, प्रभा भोंग, जयश्री उकिरडे, कल्पना ठोकळ, सखुबाई बोरगे, निकिता देशपांडे, सुनंदा रच्चा, ज्योती कानडे, विद्या दगडे, मिरा महाजनी, भारती गुंदेचा, हिराबाई सोन्नीस, अर्चना बिटला, आशाबाई पवार, कोमल वाकळे, डॉ. स्मिता पठारे, डॉ. सुलभा पवार, नंदाताई पांडुळे आदींसह विविध क्षेत्रातील 75 महिलांचा सन्मान करण्यात आला.