Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Water Restrictions: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेचा कठोर निर्णय; वॉशिंग सेंटर, बांधकामांना पिण्याचे पाणी बंद!

पाणीगळती रोखण्यासाठी विशेष पथके; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, नव्या काँक्रिट रस्त्यांच्या कामांनाही बंदी

पुढारी वृत्तसेवा

नगर: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकाने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी गळती रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. तर, वाशिंग सेंटर व बांधकामास महापालिकेचे पाणी वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच नगरसेवकांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासनाने सर्वच शहरात दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. मुळा धरणातून वसंत टेकडी येथे पाणी आणले जात असून, तेथून जलवाहिनीद्वारे पाण्याचे वितरण होत आहे. अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती असून, व्हॉल्व्ह व इअर व्हॉल्व्हलाही गळती आहे. मुख्य जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांमधून होणारी पाणीगळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसल्याने पाणी गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. संबंधित नळ कनेक्शन धारकांना तोट्या बसविण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच, अनधिकृत नळ कनेक्शन शोधून कारवाई करण्यात येणार आहे. पाण्यासाठी नासाडी करणाऱ्या नळ कनेक्शनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त यशवंत डांगे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

शहरात सुरू असलेल्या खासगी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांसाठी मनपाच्या पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. वाहने धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसिंग/वाशिंग सेंटरमध्ये होणारा पाण्याचा मोठा अपव्यय थांबवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबवण्याचे आदेश दिले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाशिंग सेंटर्सवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

काँक्रिट रस्त्यांच्या कामांना बंदी

शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात नव्याने अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, दुष्काळी पार्श्वभूमीवर शासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने शहरातील नव्याने होणाऱ्या सिमेंट कॉंक्रिट रस्ता कामांना बंदी करण्यात आली आहे. तसा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी महापालिकेने ही कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली. नागरिक, व्यावसायिक व बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा. पाण्याची नासाडी करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
यशवंत डांगे, आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT