Murder Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Crime: वाकोडीत किरकोळ वादातून निर्घृण खून; दोघे जेरबंद

उसाच्या शेतात नेऊन दांडक्याने व दगडाने ठेचून हत्या; पोलिसांनी दोन दिवसांत उलगडा

पुढारी वृत्तसेवा

नगर: वाकोडी ते बाबुर्डी (ता. नगर) रस्त्यावर किरकोळ शिवीगाळ तरुणाच्या जिवावर बेतली. किरकोळ वादातून दोघांनी ऊसाच्या शेतात नेले. लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून ऊसाच्या शेतात फेकून दिला. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली.

मयताच्या पत्नीने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. पोलिसांनी दोन दिवसांत क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून दोघांच्या मुसक्या आवळल्या. शुभम हरी भोसले (वय 20), समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे (वय 42) असे संशयित आरोपींची नावे आहेत. तर, प्रसाद रोहिदास जाधव (वय 39, रा. वाकोडी) असे मयताचे नाव आहे.

मयत प्रसाद जाधव 26 एप्रिल रोजी दुपारी न्यू आर्ट्स कॉलेज येथे स्पर्धा परीक्षेचा पेपर देण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्र झाली तरी ते घरी न आल्याने पत्नी अश्विनी जाधव यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर व पथकाने तपासाची चक्रे फिरवली. बुरुडगाव रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी 29 एप्रिल रोजी पहाटे वाकोडी परिसरात ‌’कोंबिंग ऑपरेशन‌’ राबवून शुभम भोसले, समाधान सोनवणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

अन्‌‍ खुनाचा उलगडा झाला...

पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतलेल्या दोघांना खाकीचा धाक दाखविताच ते बोलते झाले. 26 एप्रिलच्या रात्री साडेआठ वाजता बुरुडगाव ते बाबुर्डी रोडने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला प्रसाद जाधव दिसले. जाधव यांनी आरोपींना शिवीगाळ केल्याने त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी जाधव यांना त्यांच्याच मोटारसायकलवर बसवून वाकोडी शिवारातील उसाच्या शेतात नेले. तेथे लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली.

जाधव यांनी जीव वाचवण्यासाठी उसात पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून शेतात फेकून दिला. त्यांची मोटारसायकल सीना नदीच्या पुलाजवळील काटवनात सोडून दिली, अशी आरोपींनी कबुली दिली. याप्रकरणी अश्विनी जाधव यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT