नगर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.8) ऑनलाइन जाहीर केला. अहिल्यानगर जिल्ह्याचा 92.69 टक्के निकाल लागला असून गतवर्षाच्या तुलनेत तो जेमतेमच राहिला. जिल्ह्यात यंदाही मुलांपेक्षा मुलींनी सरस कामगिरी करत वर्चस्व कायम ठेवले.
गत आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. तेव्हापासून दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही निकालाची उत्कंठा लागली होती. शुक्रवारी निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. दुपारी निकालाची लिंक सुरू होताच सायबर कॅफे, मोबाईल व संगणकांवर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या. काही ठिकाणी पेढे वाटून जल्लोषही करण्यात आला.
नगर जिल्ह्यातून यंदा 67970 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 63004 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 92.69 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अवघी 0.85 टक्के निकालात वाढ झाली आहे. मुलांचा निकाल 90.40 टक्के, तर मुलींचा निकाल 95.53 टक्के इतका नोंदविला गेला.
परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, भास्कर पाटील यांनी शिक्षण विभाग, महसूल प्रशासन व पोलिस यंत्रणांच्या माध्यमातून कॉपीमुक्त अभियान राबविले. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, भरारी पथके आणि विशेष निरीक्षणामुळे शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा पार पडली.
तालुकानिहाय निकाल
अकोले 95.82, जामखेड 93.94-, कर्जत 93.35, कोपरगाव 92.70, नगर 93.08, नेवासा 89.89, पारनेर 95.44, पाथर्डी=92.20-, राहाता 91.88, राहुरी 92.49, संगमनेर 95.19, शेवगाव 85.74, श्रीगोंदा 96.13, श्रीरामपूर 89.58.एकूण...92.69 टक्के
श्रीगोंदा तालुका जिल्ह्यात टॉपर
जिल्हास्तरावर श्रीगोंदा तालुक्याचा निकाल 96.13 टक्के लागला असून तो टॉपर राहिला आहे. त्याखालोखाल अकोले आणि पारनेर तालुक्याचा निकाल लागला आहे. शेवगाव तालुक्याचा निकाल तुलनेने सर्वात कमी राहिला.