नगर: अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व बीड जिल्ह्यातील बहुचर्चित सिस्पे, इनफिनाईट बिकन व अन्य कंपन्यांच्या कोट्यवधीच्या आर्थिक घोटाळ्याच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेकांची खाती फ्रीज केली आहे. त्यातील 16 जणांची खाती डीफ्रीज करण्याचा निर्णय श्रीगोंदा न्यायालयाने दिला होता. त्यावर तपासी अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने औरंबाद खंडपीठाने श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निर्णय स्थगित करीत आर्थिक गुन्हे शाखेला दिसाला दिला.
सिस्पे, इनफिनाईट व अन्य तत्सम कंपन्यांविरोधात श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून या सर्व प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व पोलिस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासादरम्यान कंपनीचे संचालक, एजंट व संबंधितांच्या बँक खात्यांमधील व्यवहार संशयास्पद आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची खाती फ्रीज करून त्यातील रक्कम गोठवली होती. मात्र, फ्रीज केलेल्या खातेदारांपैकी 16 जणांनी श्रीगोंदा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सत्र न्यायालयाने 12 मे 2026 रोजी 14 एजंट (गैरलाभार्थी) आणि दोन संशयित आरोपींची खाती डिफ्रिज करण्याचा आदेश दिला होता.
या आदेशामुळे इतर खातेदारही न्यायालयात जाऊन खाती मुक्त करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयातील सरकारी वकील ॲड. पवन लखोटीया, तसेच येथील सरकारी वकील ॲड. केदार केसकर यांच्या माध्यमातून तपासी अधिकारी डॉ. गोर्डे यांनी न्यायालयासमोर सविस्तर बाजू मांडली. घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रूपयांची असून संशयित आरोपींची खाती तपासाच्या दृष्टीने फ्रीज ठेवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर उच्च न्यायालयाने श्रीगोंदा सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई योग्य असल्याचे मान्य केले. या निर्णयामुळे घोटाळ्यातील रक्कम सुरक्षित राहण्याचा मार्ग मोकळा झाला असून तपासालाही बळ मिळाले आहे. या निर्णयामुळे हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर न्यायालयाने विश्वास दर्शवल्याचे मानले जात आहे.
सहा हजार खात्यातील रक्कम फ्रीज
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सिस्पे-इनफिनाईट घोटाळ्याच्या तपासात कंपनीचे संचालक, एजंट व अन्य संबंधितांनी आर्थिक लाभ घेतल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने कंपनी, संचालक व एजंटांच्या व्यवहारांची छाननी करून सुमारे दोन हजार बँक खाती फ्रीज केली आहेत. याशिवाय सुमारे सहा हजार खात्यांमधील संशयास्पद रक्कम गोठविण्यात आली आहे. त्यामुळे डिफ्रिज आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पोलिसांचा तपास अधिक मजबूत झाला आहे.