

पाथर्डी: पाथर्डी पोलिसांनी अवैध दारूनिर्मितीविरोधात मोठी कारवाई करीत शंकरवाडी येथील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत 1 लाख 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली.
पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.3) पहाटे सहा वाजता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाळ वस्ती, शंकरवाडी (ता. पाथर्डी) येथील शिवारात छापा टाकला. या कारवाई दरम्यान जालिंदर दत्तात्रय लोणारे (वय 22, रा. गोपाळ वस्ती, शंकरवाडी) याच्या ताब्यातील गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकली.
छाप्यामध्ये 700 लिटर कच्चे रसायन (किंमत 70 हजार रुपये), 150 लिटर तयार गावठी दारू (किंमत 30 हजार रुपये), नवसागराच्या सहा वड्या, तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 1 लाख 340 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी कच्चे रसायन जागीच नष्ट केले असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, देवराव ढगे, संदीप कानडे, संदीप कळमकर, भगवान टकले, गोविंद दराडे ,होमगार्ड किसन सदामत, ज्ञानदेव बडे यांनी सहभाग घेतला.
अवैध दारू व्यवसायाविरोधात मोहीम
पाथर्डी तालुक्यात अवैध दारूनिर्मिती व विक्रीविरोधात पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.