

नगर: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. महायुतीने प्राजक्त तनपुरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली असताना, राष्ट्रवादीचे दत्तात्रेय पानसरे आणि भाजपाचे कमलेश गांधी यांनी बंडखोरी करून ‘अपक्ष’ भरलेले अर्ज माघारीसाठी रात्री उशीरापर्यंत घडामोडींना वेग आला होता. याशिवाय ठाकरे गटाचे मच्छिंद्र धुमाळ आणि काँग्रेसचे करण ससाणे असे दोघांचेही ‘अपक्ष’ अर्ज असल्याने त्यांचा काय निर्णय होतोय, कोण उमेदवारी करतोय, की शेवटच्या क्षणी ‘ठरल्या’ प्रमाणे तनपुरेंना बिनविरोध दिले जाणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
अहिल्यानगरच्या विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच भाजपाने वरचष्मा ठेवला. अगदी जागावाटपातही त्यांनी राष्ट्रवादीची जागा असतानाही ती खेचून आणली. त्यानंतर पक्षाकडे इच्छूक होते, मात्र त्यांनी प्राजक्त तनपुरे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यावर सत्यजित कदम यांनी थोडीफार नाराजी दाखवली, मात्र, त्यांनी नाहक पंगा घेण्याचे टाळले. राष्ट्रवादीतही सचिन अरूणकाका जगताप यांनी अर्ज भरावा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र महायुती धर्म पाळताना त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी राष्ट्रवादीचेच पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. नगरसेवकांच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज भरला आणि आता निवडणूक लढवणार, असे त्यांच्याकडून ‘रात्रीपर्यंत्त’ तरी सांगितले जात होते. आज त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. शेवगाव नगरपालिकेचे भाजपाचे नगरसेवक कमलेश गांधी यांचे दुखणे वेगळेच आहे.
भाजपाचे पाच नगरसेवक आहेत. मात्र त्यांची कामे केली जात नाहीत, निधी दिला जात नाही, अशाही त्यांच्या व्यथा आहेत. याकडे दुर्दैवाने पक्षश्रेष्ठी लक्ष देत नाही. या व्यथेतून कमलेश गांधी यांना उमेदवारी करण्यासाठी त्यांच्या सहकार्ऱ्यांकडून आग्रह सुरू असल्याचे समजते. आमदार मोनीका राजळे यांच्याकडून रात्री उशीरापर्यंत गांधी यांची मनधरणी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती समजली. अकोल्याचे मच्छिंद्र धुमाळ हे ठाकरे सैनिक आहेत. नगरची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला गेल्याने त्यांना शक्य असतानाही पक्षाचा एबी फॉर्म आणता आला नाही. त्यामुळे अपक्ष अर्ज भरून ठेवला आहे. मविआतून आपल्याला मदत होईल, अशी त्यांची भावना आहे. परंतु, ससाणे यांनी उमेदवारी करावी, यासाठीही ते अनुकूल आहेत.
करण ससाणे यांच्याविषयीही संभ्रम कायम आहे. ते काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष असतानाही त्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसोबत अर्ज का भरला नाही, हेही कोडेच आहे. मध्यंतरी विखे पाटलांशी त्यांची काहीशी जवळीक वाढल्याने पक्षातूनच त्यांच्याविषयी नाराजीचे सूर होते. त्यामुळे ससाणेंवर पक्षाचा विश्वास नाही, म्हणून त्यांना एबी फॉर्म देण्याचे टाळले का, की ‘जर माघार घ्यायची वेळ आली तरी नाहक पक्षाचे खापर नको’, म्हणून स्वतः ससाणेंनाच अपक्ष उमेदवारी अर्ज भरून स्वतःला सेफझोनमध्ये ठेवायचे होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.
एकूणच, काँग़्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने अगोदरच आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्यामुळे आज भाजपाच्या तनपुरेंविरोधात ससाणे, धुमाळ, पानसरे की गांधी? यापैकी कोण उमेदवार असेल? कदाचित, काल रात्रीपर्यंत्तच्या घडामोडी पाहता आज अनेक नाट्यमय घडामोडी घडणार असल्याचे संकेत आहेत.