Women Empowerment Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Single Women Empowerment: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकल महिलांसाठी राज्यस्तरीय धोरण

अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झालेल्या एकल महिला सक्षमीकरण उपक्रमाचे राज्यस्तरावर अनुकरण; राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

नगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यात एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. चार वर्षांपूर्वी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झालेल्या कामाचे आता राज्यस्तरावर अनुकरण होत आहे. अशा शब्दात शासनाच्या या निर्णयाचे अहिल्यानगर जिल्हा एकल महिला सक्षमीकरण समितीचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी स्वागत केले आहे.

देशमुख म्हणाले की, 2022 साली तत्कालीन महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व उमेदच्या जिल्हा शाखेमार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले. असे सर्वेक्षण करणारा अहिल्यानगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या कामाचे अनुकरण करण्यात आले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली एकल महिला सक्षमीकरण समिती स्थापन करण्यात आली. विखे यांनी एकल महिलांना तात्पुरती मदत देण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल, अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखालील एकल महिला सक्षमीकरण समितीला दिल्या.

त्यानुसार डॉ. आशिया यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून एकल महिलांना प्रशिक्षण देण्याचा आराखडा तयार केला. पहिल्या टप्प्यात 300 एकल महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यात आले. आता एकल महिलांची पात्र मुले आणि मुलींना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विशेष लक्ष घातले असून, ते प्रत्येक महिन्याला या कामाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या कामाला गती आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा प्रशासन यांच्यातील सुयोग्य समन्वयामुळे जिल्ह्यातील एकल महिला सक्षमीकरणाचे काम राज्यस्तरावर दखलपात्र होत आहे, असे देशमुख म्हणाले.

पालकमंत्र्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार: देशमुख

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत एकल महिलांसंदर्भात केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल देणार आहोत. राज्यासाठी एकल महिलांचे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील काम व आलेल्या अनुभवांची शिदोरी त्यांच्या पुढे मांडणार असल्याचे असे देशमुख यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT