नगर: वन विभागाच्या जिल्हा कार्यालयातील वन कर्मचाऱ्याला झाडाला बांधून कार्यालयातील चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मुसक्या आवळल्या. मसीद नसीब गोलवाल (वय 24), शाहीदखा अलीखा कलेसे (वय 26, दोघे रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वन विभागीय कार्यालयात 18 एप्रिल 2026 रोजी रात्री रात्रपाळीस तैनात असलेले वनमजूर रमेश पोपट शेळके यांना अनोळखी चार आरोपींनी अशोकाच्या झाडास बांधून सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील वीस हजारांची दोन चंदनाची झाडे तोडून नेली. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक तयार करून आरोपींच्या शोधाकामी रवाना केले.
पथकाने सीसीटीव्हीची माहिती घेऊन आरोपींची नावे निष्पन्न केली. रेकॉर्डवरील आरोपी मसीद गोलवाल (रा. छत्रपती संभाजीनगर) याने व त्याच्या साथीदारांनी गुन्हा केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सलग पाच दिवस शोध मोहीम राबवून वरील दोघांना अटक केली. त्यांनी गुन्हा कबूल करत साथीदार असलमखा भुरेखा पठाण, नसीबखा मुनीरखा जोनवाल (दोघे रा. माहुली, आडगाव, सरक, ता. जि. छत्रपती संभाजीनगर (फरार) यांचाही गुन्ह्यात समावेश असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला मात्र, ते मिळू शकले नाही. आरोपींकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांची पाच दिवसांची मोहीम
आरोपी संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल पाच दिवस छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील अजिंठा, सिल्लोड, बदनापूर, आडगाव माऊली, खामगाव, पळसे या परिसरात तपास मोहीम राबविली. आरोपींना सुगावा न लागता अतिसंवेदनशील भागातून दोघांना ताब्यात घेतले.
न्यायालयातही चोरी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केलेल्या आरोपींनी फरार आरोपींच्या साथीने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातूनही चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या गुन्ह्यातही वरील आरोपी फरार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली.