नगर: ग्रामीण भागातील नाट्यकलावंतांना सादरीकरण करताना प्रकाशयोजना, ध्वनी, नेपथ्य व इतर तांत्रिक बाबींमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामीण नाट्य संघांनी एकमेकांना सहकार्य करत संघटितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, नाट्यदिग्दर्शक व समीक्षक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण नाट्यसंघांचा सहविचार मेळावा नुकताच डॉ. राजेंद्र धामणे यांच्या आश्रमात, मनगाव (ता. नगर) येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. सोमनाथ मुटकुळे होते. मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील यांनी केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण नाट्य संघप्रमुख व तांत्रिक कलाकारांचा असा एकत्रित मेळावा प्रथमच होत असल्याने सर्व कलावंतांमध्ये विशेष उत्सुकता होती. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दहा नाट्य संघप्रमुखांसह 22 कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. मेळाव्यात कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील नाट्यकलावंतांना येणाऱ्या बॅकस्टेज तंत्रज्ञानाच्या अडचणी, प्रशिक्षित तंत्रज्ञांचा अभाव, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होताना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
डॉ. मुटकुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण आणि शहरी असा भेद न करता सर्व कलावंतांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण भागातील नाट्यसंघांना सादरीकरणासाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, यासाठी आगामी काळात ग्रामीण नाट्य महोत्सवांचे आयोजन, तसेच तंत्रज्ञ घडवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे व कार्यशाळा प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण कलावंतांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करण्याची अत्यंत गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मेळाव्याची भूमिका स्पष्ट करताना डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील म्हणाले की, हा मेळावा केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता पुढील काळात कृतीतून दिसला पाहिजे. ग्रामीण नाट्य संघांनी परस्पर आधार देत एकसंघ राहिले, तरच त्यांच्या समस्यांवर प्रभावीपणे मात करता येईल, असे त्यांनी सांगितले. उर्वरित ग्रामीण नाट्य संघांनाही या चळवळीत सामील होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात (सातारा) डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित चार पुस्तकांचे प्रकाशन तसेच त्यांच्या तीन नाटकांचे ब्रेल लिपीत प्रकाशन झाल्याबद्दल त्यांचा नाट्यदिग्दर्शक व लेखक बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात डॉ. सुचित्रा धामणे व डॉ. राजेंद्र धामणे यांचाही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल ग्रामीण नाट्य महासंघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या सहविचार मेळाव्यास के. के. जाधव (शेवगाव), कैलास लोंढे (पारनेर), बाळासाहेब चव्हाण (नगर), श्रीकांत शिंदे (संगमनेर), प्रवीण घुले (अकोले), वसंत मंदावणे (कोपरगाव), दिनेश भाणे (संगमनेर), संजय हुडे (राहुरी), अशोक कर्ने (श्रीरामपूर), नवनाथ कर्डिले (श्रीरामपूर), शिवाजी पठारे (नगर), राजेंद्र जाधव (राहता), डॉ. उल्हास कुलकर्णी (अकोले), विनायक दहिवडा (अकोले), दिलीप क्षीरसागर (अकोले), सतीश मालवणकर (अकोले), डॉ. गोकुळ शिरसागर (शेवगाव), मफीज इनामदार (शेवगाव) आदी ग्रामीण नाट्य संघांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.