नगर: जवळपास गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली असून, खरीप पिकांसाठी शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. हवामान खात्याने यापूर्वी दोन-तीन वेळा पावसाचा अंदाज व्यक्त केला. मात्र पाऊस हुलकावणीच देत आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. त्यातच आगामी चार दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुन्हा व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा पावसाच्या आशेवर बसला आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांत फक्त जुलैमध्ये पावसाने सरासरीपेक्षा अधिक हजेरी लावत शेतकर्यांच्या आशा पल्लवीत केल्या. खरीप पेरणी जवळपास पूर्ण झाली. पिके वाढीसाठी आवश्यक तो पाऊस ऑगस्ट महिन्यात पडेल अशी आशा शेतकर्यांना होती. मात्र, ऑगस्ट कोरडाठाक गेला. सप्टेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत एकदाच पावसाने हजेरी लावली.
समाधानकारक पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. धरणांचे लाभक्षेत्र, नदीकाठची गावे वगळता उर्वरित ठिकाणी पावसाची नितांत आवश्यकता आहे. एक दोन पाऊस झाल्यास पिके तरतील अशी आशा शेतकरी धरुन आहेत. अशा परिस्थितीत भारतीय हवामान खात्याने १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
१९ ते २१ सप्टेंबर या तीन दिवशी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामान खात्याने आगामी चार दिवस पावसाचे असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने बळिराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, या वेळी पावसाने हुलकावणी दिल्यास खरीप हंगाम वाया गेल्यात जमा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सात तालुके ५० टक्क्यांच्या आत
जिल्ह्यात चार महिन्यांत सरासरी ४४८ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत सरासरी २६८ मिलिमीटर म्हणजे ६० टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये सात तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. सर्वात कमी राहुरी तालुक्यात २८.८ टक्के, श्रीरामपूर ३६.४, नेवासा ४३.२, शेवगाव ४४.८, राहाता ४५.३, पाथर्डी ४७.६ व नगर तालुक्यात ५० टक्के पाऊस झाला आहे.