

नगर: जिल्हा बँकेची ३८३६ मतदारांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होताच आता राजकीय आकडेमोडीला वेग आला आहे. पुन्हा एकदा प्रस्थापितांनीच बँकेतील आपल्या ‘सेफ एन्ट्री’साठी ‘समझोते’ सुरू केले आहेत. श्रीगोंदा, पारनेर, नगर आणि श्रीरामपुरात मात्र एकमत करताना नाकीनऊ येणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या अन् तितक्याच चुरशीच्या लढती रंगण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघात एक एक मत ‘लाख मोल’ बनल्याने साखरसम्राटांविरोधात सर्वसामान्य सभासद उभे राहण्याचे धाडस करूच शकत नसल्याची अनेकांची खंत आहे. आता लवकरच बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. 14 तालुक्यांतून सोसायटी मतदारसंघातून 14, एक बिगरशेती, एक शेतीपूरक, दोन महिला, एक ओबीसी, एक अनुसूचित जाती-जमाती, एक भटक्या-विमुक्तांचा प्रतिनिधी, अशा 21 संचालकांना 3836 मतदार निवडून देणार आहेत.
गायकर पुन्हा येणार?
अकोल्यात गतवेळी सोसायटी व अनुसूचित जाती जमाती अशा दोन जागा होत्या. यात सर्वसाधारण जागेवर सीताराम गायकर संचालक होते. या वेळी सुरुवातीला भामाबाई सीताराम गायकर यांचा ठराव होता. त्यामुळे सीताराम गायकर निवडणुकीत दिसणार नाहीत, असेच चित्र होते. मात्र दोन टर्मची अट शिथील होताच पुन्हा गायकर यांनी पत्नीऐवजी स्वतःचा ठराव घेऊन सूचक संकेत दिले आहेत. त्यांनी नकार दिला तरच वेगळे नाव पुढे येईल.
थोरात ठरवतील तसंच!
संगमनेरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात ठरवतील तसंच होणार आहे. या वेळीही दोन संचालक मिळतील, अशी संगमनेकरांना अपेक्षा आहे. सोसायटीतून माधवराव कानवडेे यांच्याऐवजी प्रसंगी डॉ. सुधीर तांबे किंवा रणजितसिंह देशमुख, गिरीश मालपाणी याशिवाय अन्य एकाचा बँकेत प्रवेश होऊ शकतो. भटक्या विमुक्तच्या राखीव जागेतून एकमताने गणपतराव सांगळे यांनाच पुन्हा संधी दिली जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विखे-मुरकुटे सुप्त संघर्ष?
श्रीरामपुरातून गेल्या वेळी ससाणे-मुरकुटे समझोता एक्सप्रेसमुळे दोघेही बँकेत पोहचले होते. त्या वेळी थोरातांनी मध्यस्थी केली होती. या वेळी हे दोघे एकत्र राहिले तरच पुन्हा पुनरावृत्ती शक्य आहे, अन्यथा विखे गटाकडे निर्णायक ठराव आहेतच. त्यातच, मुरकुटे-विखे विरोध हा सर्वश्रुत असताना, राम शिंदे - मुरकुटे भेटीगाठीनंतर, दीपक पटारे हेही चांगलेच ॲक्टिव्ह झाल्याने श्रीरामपुरात वेगळं काहीतरी शिजतंय का, याविषयी चर्चा आहेत.
सुजय विखेंची एन्ट्री फायनल
राहात्यात सोसायटीतून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्याऐवजी या वेळी डॉ. सुजय विखे पाटील यांचा बँकेतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. सहकारातील वर्चस्वामुळे विखेंना ‘सोसायटीतून’ फारसा कोणी विरोध करेल असेही चित्र नाही.
यंदाही काळे-कोल्हेंचे नक्की?
कोपरगावात कारखाना असो किंवा जिल्हा बँक, यामध्ये काळे-कोल्हे कधीही एकमेकांना क्रॉस करत नाहीत. गतवेळी देखील आमदार आशुतोष काळे हे शेतीपूरकमधून, तर आमदार विवेक कोल्हे सोसायटी मतदारसंघातून एकमेकांच्या हातात हात घालून बँकेत पोहचले. त्यामुळे यंदाही काळे-कोल्हे असे सोयीच्या गटांतून बँकेत दिसू शकतात.
तनपुरेच की नवा चेहरा?
राहुरीतून दोनवेळा संचालक राहिलेले अरुण तनपुरे यांच्याऐवजी राजकीय वारशाने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे किंवा प्रसंगी सुजाता अरुण तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे. तनपुरेंशिवाय, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, चंद्रशेखर कदम आदी अनुभवी दिग्गजांचे ठराव असले तरी, त्यांचा किती विचार होईल, याबाबत शंका आहे.
ठरावांमध्ये गडाखांचा वरचष्मा
नेवाशातून शंकरराव गडाख यांनाच पुन्हा बँकेत पोहचण्याचा मार्ग सुकर आहे. बहुतांशी ठरावही त्यांच्याच कार्यकर्त्यांचे असल्याचे बोलले जाते. त्यांना प्रबळ विरोधक किंवा स्पर्धक नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी घुले-लंघे-मुरकुटे गटही त्यांना विरोध करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.
ढाकणेंची समजूत कशी काढणार?
पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा संधी मिळू शकते. येथे प्रताप ढाकणे, ऋषिकेश ढाकणे यांचेही ठराव आहेत. मात्र, बिनविरोधच्या फॉर्म्युल्यात त्यांना कसे (झेडपी किंवा पंचायत समिती) विश्वासात घेतले जाते, याकडेही लक्ष असणार आहे.
कर्डिलेंविरुद्ध शेळकेंनी थोपटले दंड
नगर तालुक्यात अक्षय कर्डिले समर्थकांचे ठराव अधिक आहेत. मात्र, ‘नगर तालुका कारखान्याला कर्डिलेंनी मदत केली नाही, नोकरभरतीत तालुक्यावर अन्याय झाला,’ ही कारणे देऊन प्रताप शेळके यांनी कोणत्याही परिस्थितीत सोसायटीतून लढणारच, असे स्पष्ट केले आहे. याशिवाय, बाळासाहेब हराळ, माधवराव लामखेडे यांचीही ताकद निर्णायक ठरणार आहे.
राम शिंदे ॲक्टिव्ह
जामखेडमध्ये एका जागेवर प्रा. राम शिंदे यांचे नाव निश्चित समजले जाते. कर्जतमधून अंबादास पिसाळ हे शेवटच्या क्षणी रेसमध्ये आले आहेत. येथे राळेभात, फाळके, तापकीर अशी अनेक नावेही चर्चेत आहेत. त्यामुळे विशेषतः राम शिंदेंविरोधात उमेदवार देताना आमदार रोहित पवार यांची भूमिका काय असेल, हेही पाहावे लागेल.
लंके विरुद्ध झावरे फाईट?
पारनेर सोसायटी मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांच्याविरोधात आ. काशीनाथ दाते, सुजीत झावरे व इतर विरोधक आहेत. त्यांना विखेंची रसद मिळणार आहेच. गीतांजली शेळके यांचेही नाव आहे. त्यामुळे येथे बिनविरोधची आशा धूसर आहे. कदाचित, गीतांजली शेळके बिनविरोध होतीलही; मात्र निवडणूक लादल्यास लंके विरुद्ध झावरे (अप्रत्यक्षपणे विखे) अशी काटे की टक्कर पाहायला मिळू शकते. लंके यांनीही मोठ्या प्रमाणात ठराव घेतलेले आहेत.
...तर हायव्होल्टेज सामना
श्रीगोंद्यात गेल्या वेळी दोन जागा मिळाल्या होत्या. महिला राखीवमधून अनुराधा नागवडे व सोसायटीतून राहुल जगताप. मात्र आता प्रतापसिंह पाचपुते यांनाही बँकेत जायचे आहे. त्यामुळे नेमके थांबणार कोण, याविषयी उत्कंठा आहे. मंत्री विखे पाटील यांनी मध्यंतरी पाचपुते-नागवडेंना एकत्र आणले आहेच; तर राहुल जगताप यांच्यासाठी एक गट आग्रही आहे. शिवाय, विधान परिषद बिनविरोध करण्यासाठी तनपुरेंसह भाजपाच्या नेत्यांना मेटाकुटीला आणणाऱ्या दत्तात्रय पानसरेसह घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहटा, अशीही काही नावे विसरून चालणार नाहीत.