अविनाश डोके
राहाता नगरपालिकेत स्थानिक ‘लोकक्रांती सेनेचा प्रयोग करूनही विरोधकांना केवळ एक जागा जिंकता आली. मंत्री विखे पाटील यांनी एकहाती सत्ता राखताना विरोधकांचा सुफडा साफ केला. मतदारसंघातील राहाता आणि शिर्डी नगरपालिकेवर वर्चस्व मिळवत विखे पाटलांनी प्रभाव सिद्ध केला.
नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी राहाता नगरपालिकेची निवडणूक झाली. राहात्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फारसे प्राबल्य नाही. शिवसेनेला सोबत घेत विखे पाटलांनी त्यांना दोन जागा दिल्या, तर उर्वरित 18 जागा भाजपकडे घेतल्या. विखे पाटलांना शह देण्यासाठी ठाकरे सेनेचे धनंजय गाडेकर यांनी विखे विरोधकांची मोट बांधली. शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसला सोबत घेताना गाडेकर यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे न जाता ‘लोकक्रांती सेने’चा प्रयोग केला. या स्थानिक आघाडीच्या नावाखाली धनंजय गाडेकर यांनी पॅनल करत विखे पाटलांच्या सत्तेला सुरूंग लावण्याचा प्रयोग केला, मात्र तो सपशेल फेल गेला. धनंजय गाडेकर यांच्या लोकक्रांती सेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर विखे पाटील यांनी नगराध्यक्ष पदासह वीस जागा जिंकत राहात्यावरील वर्चस्व सिद्ध करताना विरोधकांचा पुरता सफाया केला.
लोकक्रांतीचे धनंजय गाडेकर विरोधात भाजपचे स्वाधीन गाडेकर यांच्यात नगराध्यक्ष पदाची लढत झाली. दोन्ही गाडेकर आमने-सामने आल्याने निवडणुकीत रंग भरलाी, पण तो नुसताच प्रचारापुरता दिसून आल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. भाजपचे डॉ. स्वाधीन गाडेकर तब्बल 4599 मताधिक्याने विजयी झाले. नगराध्यक्षासह नगरसेवकांचा निकाल लागताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मंत्री विखे पाटील व माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोषात सहभाग घेतला. गुलालाची उधळण करत राहाता शहरातून मंत्री विखे पाटील यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्यासह नगरसेवकांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. विखे विरोधी आघाडीचे शशिकांत लोळगे हे एकमेव उमेदवार विजयी झाले.
नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. काही मिनिटांत कल समोर आला. तासभरात मतमोजणी प्रक्रिया संपली तेव्हा विखे यांच्या भाजपला 20 जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले अन् पाठोपाठ घोषणाबाजी, जल्लोष आणि गुलालाची उधळण सुरू झाली.
हा विजय भाजपचा असून मी हा विजय राहाता येथील जनतेला समर्पित करतो. डॉ सुजय विखे यांनी शिर्डी व राहाता नगरपरिषदेत सुरुवातीपासून लक्ष देत सर्व उमेदवार निवडून आणले, त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करतो.राधाकृष्ण विखे, पालकमंत्री, अहिल्यानगर