Police Externment Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police: गणेशोत्सवासाठी अहिल्यानगर पोलिसांचा कडक बंदोबस्त! ४९२ जण दोन दिवस हद्दपार

६०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जनाच्या दिवशी पोलिसांचा कडक वॉच

पुढारी वृत्तसेवा

नगर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कोतवाली, तोफखाना व कॅम्प या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे ४९२ जणांवर दोन दिवसांकरिता हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर, रेकॉर्डवरील ६०८ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीतील आनंदाचा सण म्हणजे गणेशोत्सव आहे. प्रत्येकांच्या घरामध्ये मनोभावे श्री गणेशाची स्थापना केली जाते. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक कॉलनीमध्ये सार्वजनिक मंडळे श्री गणेशाची स्थापना करतात. अहिल्यानगर शहरातही गणेशोत्सवास मोठी परंपरा आहे. ग्रामदैवत श्री विशाल गणेशासह मानाच्या गणपती मिरवणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

शहरातील गणेशोत्सव निर्विघ पार पडावा यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यव्सथा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रतिबंधक कारावयांचा धडका लावला आहे. तर, अनेकांचे कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

उत्सव काळात वाद घालणारे अशा रेकॉर्डवरील ६०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ४९२ जणांविरोधात दोन दिवस हद्दपारी कारवाई करण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच श्री गणेश स्थापन दिन आणि विसर्जन दिनी ४९२ जण शहरातून हद्दपार राहणार आहेत. त्यांना नोटिसा बजविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हद्दपार केल्यानंतर पोलिसांचा त्यांच्यावर वॉच राहणार आहे.

गणेश मंडळांबरोबर ३० बैठका

गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी तोफखाना कोवताली पोलिसांकडून संवाद आणि समन्वयासाठी गणेश मंडळे, मोल्हला कमिटी, शांतता समित, धर्मगुरू, वाद्य पथक, पोलिस मित्र यांच्याबरोबर आतापर्यंत ३० बैठका झाल्या आहेत. गणेश उत्सव शांततेत व आनंद पार पाडण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.

उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, उत्सवाच्या काळात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल.
डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस उपअधीक्षक शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT