

नगर: दीड महिन्याच्या खंडानंतर अहिल्यानगर शहर व परिसरात शनिवारी (दि. १२) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी (दि.१४) घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना होत असून बाप्पासोबतच पावसाचेही आगमन झाले आहे.
पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. धरण पाणलोटात सुरूवातीलाच झालेल्या पावसाने पाणीसाठा झाला खरा; मात्र लाभक्षेत्रात पावसाने दडी मारली. परिणामी धरणे भरली; पण शेतीसाठी आवश्यक पाऊसच पडला नाही. पावसाच्या खंडाने पिकांसोबतच पशुधनाच्या चाऱ्याचे विघ्न निर्माण होण्याची चिंता असतानाच श्रींच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला पावसाचेही आगमन झाले.
अहिल्यानगर शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अधूनमधून सरी जोर धरत होत्या. लाडक्या बाप्पाचे सोमवारी घरोघरी व सार्वजनिक मंडळात आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी अहिल्यानगरी सज्ज झाली आहे.
सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे. ठिकठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत. पावसाची रिपरिप सुरू असली तरी बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. जिल्हाभर सर्वत्र वातावरण ढगाळ असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस परतणार असून पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.