Dispute Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Workers Attack: नो पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर टोळक्याचा हल्ला

ओंकार घोलपसह १० ते ११ जणांवर गुन्हा; लोखंडी फायटर आणि बेल्टने मारहाणीत दोन कर्मचारी गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातील इम्पेरियल चौकात नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचे काम करणाऱ्या महापालिकेच्या ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर ओंकार घोलप आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी घडली. लोखंडी फायटर, बेल्ट व दुचाकीचा वापर करून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

दरम्यान, या हल्ल्यात ठेकेदार कंपनीचे टिम लीडर लतेश रणमले आणि चालक पांडुरंग शिंदे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सावेडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ओंकार घोलप याच्यासह अनोळखी दहा ते ११ जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवा माणिक भोरे (वय १९, रा. सिद्धार्थनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादी भोरे हे दिग्विजय एन्टरप्रायजेस या महापालिकेच्या अधिकृत ठेकेदार संस्थेत नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचे काम करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते चालक पांडुरंग शिंदे, लतेश मनोज रणमले, ओम शैलेश भवाळ यांच्यासोबत ट्युईंग वाहनातून शहरात काम करीत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माळीवाडा बसस्थानक परिसरातील इम्पेरियल चौकात वेलनेस मेडिकलसमोर नो पार्किंगबाबत स्पीकरवरून सूचना देत असताना ओंकार घोलप व त्याच्यासोबत असलेल्या चार जणांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर चालक शिंदे यांना वाहनातून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. टिम लीडर रणमले यांनी याबाबत जाब विचारला असता, 'तुम्ही खूप माजले आहात, या रस्त्यावर गाड्या कशा उचलता तेच पाहतो, मी इथला दादा आहे,' अशी धमकी दिली.

दरम्यान, घोलपसोबत असलेल्या एका व्यक्तीने वाहनावर चढून हातातील बेल्टने शिवा भोरे आणि ओम भवाळ यांना मारहाण केली. त्यानंतर घोलप याने आणखी १० ते ११ जणांना बोलावून घेतले. या टोळक्याने कर्मचाऱ्यांच्या वाहनाला घेराव घातला. घोलप याने हातातील लोखंडी फायटरने टिम लीडर रणमले यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. अन्य एका व्यक्तीने दुचाकी रणमले यांच्या अंगावर घातली. चालक शिंदे यांच्यावर लोखंडी फायटरने वार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ओंकार घोलपवर १७ गंभीर गुन्हे

या घटनेनंतर ओंकार घोलप याच्या कथित गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा समोर आला. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण आणि आर्म अॅक्टसह विविध गंभीर स्वरूपाचे‌ १७ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर गंभीर कलमे लावू नयेत किंवा गुन्हा दाखल झाला तरी अटक करू नये, अशा प्रकारे पोलिस प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. यापूर्वी त्याच्यावर हद्दपारी व एमपीडीएची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्याला मंजूर मिळाली नाही.

‘मोक्का’ कारवाईची मागणी

महापालिकेच्या अधिकृत ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मारहाण होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कथित घोलप टोळीविरुद्ध मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, आरोपींना अटक होते का, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT