Rahuri Water Supply: राहुरीत दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय; नागरिक संतप्त, पाणीपट्टी माफीची मागणी

दुष्काळाच्या नावाखाली पाणी कपातीचा आरोप; पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांमधील वादामुळे नियोजनावर प्रश्नचिन्ह
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

राहुरी: दुष्काळाच्या नावाखाली पाणीपुरवठा कमी करून नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले जात असल्याच्या चर्चांना गावोगावी उधाण आले आहे. पाण्याच्या नियोजनापेक्षा कर्मचाऱ्यांमधील वादालाच अधिक महत्त्व मिळत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राहुरी नगरपरिषद प्रशासनाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्धार जाहीर करताच शहरातील नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला आहे.

Water Supply
Kukadi Water Release: कुकडीचे पाणी मिळावे म्हणून शेतकऱ्यांचा रास्ता रोको; दोन तास वाहतूक रोखली

नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष हर्ष तनपुरे आणि मुख्याधिकारी विद्या पाटील यांनी पत्र प्रसारित करून पाणीपुरवठ्याबाबत नवीन नियोजन जाहीर केले आहे. मात्र, धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था असताना पाणीपुरवठ्याचे नियोजन नेमके कोणत्या आधारावर केले जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. धरणात पाणी असताना नागरिकांच्या नशिबी पाणीटंचाई का, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडूनही पाणी कपातीचे संकेत मिळत असल्याने परिसरातील नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.

Water Supply
Ahilyanagar Population Census 2027: अहिल्यानगरची लोकसंख्या ५० लाखांपार जाण्याची शक्यता; मतदारसंघ पुनर्रचनेकडे लक्ष

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पाणी योजनांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात पाणी योजनांच्या व्यवस्थापनात समन्वयाचा अभाव आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बारागाव नांदूर १४ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बारागाव नांदूर ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहे. गावाची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांमध्येच समन्वय नसल्याचे चित्र समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर बारागाव नांदूर येथे पाणीपुरवठा योजनेचे समन्वयक शौकत इनामदार आणि ग्रा.पं.चे पाणीपुरवठा कर्मचारी मतीन इनामदार यांच्यात वाद उफाळून आला. समन्वयक शौकत इनामदार यांनी मतीन इनामदार यांना खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पाणीपुरवठा यंत्रणेतील वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच पाणीपुरवठा कर्मचारी मतीन इनामदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Water Supply
Karjat Student Assault Case: स्कॉलरशिपच्या मेसेजवरून विद्यार्थ्याचे अपहरण; जंगलात नेऊन बेदम मारहाण

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांना नियोजन आणि काटकसरीचे धडे दिले जात असताना पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येच वादाची ठिणगी पडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन, पाणी योजना आणि ग्रामपंचायत यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असताना परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप आणि शिवीगाळीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या यंत्रणांचा समन्वय नेमका कुठे हरवला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुष्काळाची तीव्रता नागरिकांनी सहन करायची, पाणी कपातीचा फटका सर्वसामान्यांनी सोसायचा आणि पाणीपुरवठा यंत्रणेतील वादांचे चटकेही नागरिकांनीच भोगायचे, अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे. पाणीपुरवठा कमी करण्यापूर्वी उपलब्ध पाणीसाठा, प्रत्यक्ष मागणी, वितरणातील गळती, गावनिहाय गरज आणि पाणीवाटपाचे वेळापत्रक यांचा पारदर्शक आढावा घेणे आवश्यक आहे. केवळ दुष्काळाचे कारण पुढे करून नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर गदा आणली जात असेल, तर त्याचा जाब संबंधित प्रशासनाने द्यायलाच हवा.

Water Supply
CM Samruddha Panchayat Raj Abhiyan: पारदर्शीपणामुळे पंचायत राज अभियान यशस्वी होईल; वशिलेबाजीवर राम शिंदेंचा प्रहार; मंत्री गोरे यांचे कौतुक

दुष्काळाच्या संकटात पाणी योजनांनी नागरिकांना आधार देणे अपेक्षित आहे; मात्र यंत्रणांमधील संघर्षच नागरिकांच्या घशाला कोरड पाडणार असेल, तर अशा व्यवस्थेचा उपयोग काय? पाणीपुरवठ्याच्या नावाखाली सुरू असलेला सावळागोंधळ थांबवून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, उपलब्ध पाण्याचे पारदर्शक नियोजन करावे आणि कर्मचाऱ्यांमधील वादावर जबाबदारी निश्चित करावी. अन्यथा दुष्काळाच्या झळांपेक्षा पाणी नियोजनातील गोंधळच राहुरीकरांच्या संतापाचा भडका उडविण्यास कारणीभूत ठरेल.

पाणीपट्टी माफीची मागणी

दुष्काळाचे कारण पुढे करून पाणीपुरवठ्यात कपात केली जात असेल, तर नागरिकांकडून पूर्ण पाणीपट्टी कशासाठी वसूल केली जाते, असा सवाल उपस्थित होत आहे. पाणीपुरवठ्याचे दिवस आणि उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी झाले असताना पाणीपट्टी मात्र पूर्वीप्रमाणेच आकारली जाणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून नागरिकांची पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी किंवा ज्या प्रमाणात पाणीपुरवठ्यात कपात केली आहे, त्याच प्रमाणात पाणीपट्टीतही सवलत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाणी कमी आणि बिल पूर्ण, हा अन्यायकारक कारभार थांबवून नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.