नगर: पालिकांच्या जाहीर प्रचाराची सांगता नगराध्यक्षासह 104 जागांसाठी आज मतदान; 376 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायत निवडणुकीचा जाहीर प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी थांबला. आज शनिवारी (दि.20) या चारही नगरपालिकांच्या नगराध्यक्षासह 104 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान आज मतदान होत असलेल्या व यापूर्वी झालेल्या आठ नगरपालिकांची मतमोजणी रविवारी होत आहे.
आज शनिवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, अभय आव्हाड, विजय वहाडणे, राजेंद्र झावरे तसेच काका कोयटे, पराग संधान आदींसह 376 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 12 पालिकांपैकी आठ पालिकांच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी झाल्या. कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी व नेवासा या पालिकांचे काही उमेदवार न्यायालयात गेले.
परंतु निकाल उशीरा जाहीर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास त्यांना वेळ मिळू शकला नाही. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने या चार पालिकांसह सात पालिकांतील नगरसेवकपदाच्या बारा जागांच्या निवडणुका लांबणीवर टाकत 20 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले.
त्यामुळे 104 जागांवरील 376 उमेदवारांना प्रचारास जादा अवधी उपलब्ध झाला. परंतु आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली नसल्याने जाहीर प्रचारास आळा घालून डोअर टू डोअर प्रचार करण्याची वेळ उमेदवारांवर आली. अशा परिस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नरहरी झिरवळ यांच्यासह अन्य मंत्र्यांनी तसेच त्या त्या राजकिय पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात हजेरी लावत निवडणुकीची रंगत वाढवली. जाहीर प्रचाराचा शुक्रवारी (दि.19) शेवटचा दिवस होता. बहुतांश ठिकाणी मिरवणूक काढून प्रचाराची सांगता करण्यात आली.
सात पालिकांतील 12 जागांवर मतदान
कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायत या चार पालिकांच्या चार नगराध्यक्षपदासह 92 जागांसाठी तसेच सात पालिकांच्या 12 जागा अशा 104 जागांसाठी शनिवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी नगरपालिकांची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.