नगर: महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना मतदारांना पैसे वाटप केल्याच्या संशयावरून एका उमेदवाराच्या कार्यकर्त्याच्या दुचाकी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यातील एका दुचाकीच्या डिक्कीत एका लाखांची रोकड आढळून आली. महापालिका निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने पंचनामा करून रोकड जप्त केली. ही घटना मंगळवारी (दि. 6) सकाळी दिल्ली गेट परिसरात घडली.
दिल्ली गेट परिसरात मतदारांना पैशाचे वाटप सुरू असल्याची माहिती मंगळवारी सकाळी तोफखाना पोलिसांना मिळाली होती. तोफखाना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त असलेल्या भरारी पथकालादेखील पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित पोलिस व भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील दुचाकीस्वारांना अडवून दुचाकी मालकांनी पुढे यावे, असे आवाहन केले. त्यानुसार एका दुचाकीचा मालक पुढे आला. पंचासमक्ष त्याच्या दुचाकीची डिक्की उघडून तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही रोकड आढळून आली नाही. मात्र, काही कागदपत्रे मिळून आली.
दरम्यान, दुसरी दुचाकी विनानंबरची असून तिचा मालक घटनास्थळी पुढे न आल्याने ती दुचाकी पंचासमक्ष सील करून तोफखाना पोलिस ठाण्यात आणण्यात आली. पोलिस ठाण्यात पोलिस, भरारी पथकातील अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत सदर दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून तपासणी करण्यात आली.
यावेळी डिक्कीमध्ये एक लाख रुपयांची रोकड आढळून आली. त्यानंतर भरारी पथकाने सदर रक्कम पंचनामा करून ताब्यात घेतली. दरम्यान, उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतदारांना पैशांचे वाटप केले जात असल्याची माहिती पसरताच दिल्लीगेट परिसरात पक्षाचे कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.