नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दोन दिवसांत विविध पक्षांनी प्रचारासाठी सभा, पदयात्रा, कोपरा सभांचा दणका सुरू केला आहे. मनपा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षातून आतापर्यंत 59 पदयात्रा, चौकसभा, कोपरा सभांना परवानगी देण्यात आली आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक व काटेकोरपणे पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तक्रार देण्यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आचारसंहिता कक्षातून प्रचार सभा, कोपरा सभा, चौक सभा पदयात्रा, होर्डिंग, फलक, पोस्टर परवानगी देण्यात येत आहे. शनिवारी कक्षातून विविध पक्षांच्या प्रचारासाठी 25 परवाने देण्यात आले होते. तर, रविवारी विविध पक्षांना प्रचारासाठी पदयात्रा, चौक सभा, कोपरा सभा यासाठी सुमारे 24 परवाने देण्यात आले आहेत. परवानगीसाठी एक खिडकी कक्षाकडे अर्ज आल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर पोलिसांची पवानगी घेतली जाते. अंतिम परवानगी आचारसंहिता कक्षाकडून दिली जाते. गेल्या दोन दिवसांत विविध पक्षांच्या प्रचार, पदयात्रा, चौक सभा, कोपरा सभांसाठी 49 परवानग्या देण्यात आल्या आहेत.
मंडपाला परवानगी नाही
महापालिकेच्या सार्वजनिक जागेत सभा व प्रचार कार्यालयासाठी अद्यापि कोणीही परवानगी मागितलेली नाही. अनेक उमेदवारांनी पक्ष कार्यालय खासगी जागे स्थापन करण्यात केले आहे. महापालिकेच्या जागेत कोणाला मंडळ, प्रचार कार्यालय करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असे कक्षातून सांगण्यात आले.
आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारी
महापालिका निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षाकडे आतापर्यंत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात दोन्ही तक्रारींची आचारसंहिता कक्षातील पथकाने शहानिशा करून फेटाळून लावल्या आहेत.
35 होर्डिंगला परवानगी
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा विविध पक्षांनी होर्डिंगसाठी परवानगी मागितली आहे. त्यातील विविध पक्षांच्या 35 होर्डिंगला अधिकृत परवानगी देण्यात आल्याचे आचारसंहिता कक्षातून सांगण्यात आले.