Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Corporation: अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण समित्यांची घोषणा; भाजप-राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा जागा

महापौर ज्योती गाडे यांनी जाहीर केली 16 सदस्यांची निवड; सभेत एसी बंद व भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती प्रत्येकी 16 सदस्यांच्या निवडीची घोषणा महापौर ज्योती गाडे यांनी केली. स्थायी व मबाकमध्ये भाजप, राष्ट्रवादी प्रत्येकी सहा, शिवसेना दोन, एमआयएम व काँग्रेसच्या प्रत्येकी एक नगरसेवकाला सदस्यपदी संधी मिळाली.

महापालिका स्थायी समिती सदस्य व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी आज महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. उपमहापौर ॲड. धनंजय गाडे, आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, नगरसचिव मेहेर लहारे उपस्थित होते.

सभेच्या सुरूवातील आयुक्त यशवंत डांगे यांनी गटनेत्यांकडून बंद पाकिटामध्ये स्थायी समिती सदस्यांची नावे मागविली. राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाश भागानगरे, भाजप गटनेत्या शारदा ढवण, शिवसेना गटनेते दत्तात्रय कावरे, एमआयएमचे गटनेते शहाबाज खान, काँग्रेसचे गटनेते शम्स्‌‍ खान यांनी पक्षाच्या कोट्यानुसार बंद पाकिटामध्ये महापौर व आयुक्तांकडे सदस्यांची नावे दिली.

त्यानंतर महापौर ज्योती गाडे यांनी ती नावे सर्व सहभागृहासमोर वाचून दाखविली. त्यानंतर स्थायी समिती व महिला, बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वच नगरसेवकांनी बाके वाजून निवडीचे स्वागत केले.

दुसऱ्या सभेला एसी बंद

सभा सुरू असताना नगरसेवक डॉ. सागर बोरूडे यांनी सभागृहातील एसी सुरू करण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना करूनही एसी सुरू झाला नाही. अखेर आयुक्तांना धारेवर धरले. आयुक्तांचे दालन अत्यंत सुसज्ज करण्यात आले अन्‌‍ सभागृहात एसीही सुरू होत नाही, असे म्हणून आयुक्त यशवंत डांगे यांची फिरकी घेतली.

कुत्र्यांच्या प्रश्न ऐरणीवर

विषय पत्रिकेनुसार सभा स्थायी व महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडीसाठी होती. मात्र, काही सदस्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. नगरसेवक पुष्पा बोरूडे यांनी माळीवाडा येथे लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याचे सांगून त्याचे फोटो आयुक्तांना दाखवले. त्या चर्चेत डॉ. सागर बोरूडे यांनी सहभागी होत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

खासगी व्यक्तीचा सभागृहात दिसताच संपत बारस्कर संतापले

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतरही सभा होती. सभागृहात अनेक खासगी व्यक्ती येऊन बसल्या होत्या. आयुक्त डांगे यांनी वारंवार सूचना करूनही लोक सभागृहात दिसत होते. त्यावर नगरसेवक संपत बारस्कर यांनी संताप व्यक्त केला. कोणीपण येऊन सभागृहात बसणार अन्‌‍ मग कामकाज कसे चालणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अनेकांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT