Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Cleanliness Fine Drive: अहिल्यानगरमध्ये स्वच्छता नियमभंगावर कारवाई; दंड मोहीम तीव्र

कचरा टाकणे, लघुशंका व कचरा जाळणाऱ्यांवर महापालिकेचा कडक बडगा

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहर स्वच्छ, सुंदर व सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिकेने स्वच्छता नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.

बुधवार (दि. 22) रोजी शहरातील शहाजी रोड, नवी पेठ, घासगल्ली, तांबटकर गल्ली व गांधी मैदान परिसरात स्वच्छता मोहिमेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण सहा जणांवर या वेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण सतराशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच, उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांकडून दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.

मुख्य स्वच्छता निरीक्षक पी. व्ही. रामदिन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, प्रसाद बाळू उमाप, प्रशांत चांदणे, मुकादम किशोर वैरागर, अमर वैराळ व ओंकार साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आयुक्त डांगे यांनी नागरिकांना शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे व उघड्यावर लघुशंका करणे, उघड्यावर कचरा जाळणे टाळावे अन्यथा अशा दंडात्मक कारवाया यापुढे अधिक तीव्र करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.

उघड्यावर कचरा जाळणाऱ्याला दंड

अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील गुरू कार सजावट या दुकानदाराने उघड्यावरच दुकानातील कचरा जाळल्याने महापालिकेच्या पथकाने त्याला गुरुवारी (दि. 23) दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. कुणी उघड्यावर कचरा जाळताना आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे. कचरा घंटा गाडीतच कचरा टाकावा. स्वच्छता नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाईल.
यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT