Mula Dam Pudhari
अहिल्यानगर

Mula Dam Rabi Irrigation: मुळा धरणातून २३ फेब्रुवारीपासून रब्बी आवर्तन; ३० हजार हेक्टर क्षेत्राला लाभ

उजवा कालवा ४५ दिवस, डावा कालवा २१ दिवस; ५ टीएमसी पाणी राखीव, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचे मंत्री विखे पाटील यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नगर: मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्यांवरील शेतकऱ्यांची पाणी मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी 23 फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्याची सूचना जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या आवर्तनाचा लाभ जवळपास 30 हजार हेक्टर क्षेत्रासाठी होणार आहे.

सद्यःस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आमदार मोनिका राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदामंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

मंत्री विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचा उपलब्ध साठा तसेच भविष्यातील पाण्याचे नियोजन विचारात घेऊन आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. सदर आवर्तनाचा उजवा कालव्यावरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून, सदर आवर्तन 45 दिवसांचे असणार आहे. त्यासाठी धरणातील 5 टीएमसी इतका पाणीसाठा राखीव आहे. या आवर्तनाचा लाभ अंदाजित 27 हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे.

मुळा डाव्या कालव्यासाठी 450 एमसीएफटी इतका पाणीसाठा असून आवर्तन 21 दिवस चालणार आहे. त्याचा फायदा अंदाजे 2500 हेक्टर इतक्या क्षेत्राला होणार आहे. आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल, असे नियोजन अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

निळवंडे धरणाचे आवर्तन सुरूच

भंडारदरा धरणात 87.51 टक्के म्हणजे 9 हजार 660 तर निळवंडे धरणात 65.65 टक्के म्हणजे 5 हजार 462 दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दुसरे आवर्तन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा राहणार असल्याचे अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितले.

मुळात 83 टक्के साठा

मुळा धरणात शुक्रवारी (दि.20) सकाळी सहा वाजता 21 हजार 580 दलघफू इतका म्हणजे सरासरी 83 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये 74.44 टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणात 74.57 म्हणजे 19 हजार387 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT