गोरक्ष शेजूळ
नगर: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इच्छुकांची संख्या वाढत असल्याने ही निवडणूक चुरशीची आणि तितकीच प्रतिष्ठेची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, बुधवारी महायुतीकडून सचिन अरुणकाका जगताप, तर महाविकास आघाडीकडून करण जयंतराव ससाणे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज नेल्याने, 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा जगताप-ससाणे संघर्ष पाहायला मिळणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणूक म्हटले की, 2009 मध्ये झालेली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आजही नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते. त्या वेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, तर शिवसेना-भाजप विरोधी बाकांवर होते. काँग्रेसकडून जयंत ससाणे आणि राष्ट्रवादीकडून अरुणकाका जगताप इच्छुक होते. नगरच्या जागेवरून मोठी ओढाताण झाली. त्यानंतर मतांची बेरीज राष्ट्रवादीपेक्षा अधिक असल्याने ही जागा काँग्रेसला मिळाली. तत्कालीन साई संस्थानचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. पक्षाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यावर जगताप ठाम राहिले. परिणामी, ससाणे विरुद्ध जगताप अशी थेट लढत रंगली.
त्यावेळी काँग्रेसकडे राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची मोठी ताकद होती. शिवाय, राष्ट्रवादीही सोबत होते. विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा जादुई आकडाही एकट्या काँग्रेसकडे असल्याने ही निवडणूक तुलनेने सोपी मानली जात होती. मात्र, ऐन वेळी राजकीय गणिते बदलली. मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याच्या चर्चा रंगल्या. सोयऱ्याधायऱ्यांचे राजकारण पुढे आले आणि अपक्ष उमेदवार अरुणकाका जगताप यांनी जयंतराव ससाणे यांचा 34 मतांनी पराभव केला. ससाणेंसाठी हा पराभव मोठा धक्का मानला गेला. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत दगा फटका केला, काँग्रेसमधील एका गटानेही साथ न दिल्यानेच ससाणे यांचा पराभव झाल्याचे निष्कर्ष त्या वेळी काढले गेले. त्यानंतर 2015 मध्ये राष्ट्रवादीकडून आमदार अरुणकाका यांची उमेदवारी फायनल झाली; मात्र ससाणे यांनीही अर्ज भरला. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागल्याचा राजकीय इतिहास सांगतो. त्यामुळे अरुणकाका जगताप दुसऱ्यांदा आमदार झाले, तर ससाणे यांना हुलकावणी मिळाली.
दरम्यान, 2009 च्या निवडणुकीच्या आठवणींना तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा उजाळा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या काळातील दोन्ही प्रमुख नेते आज हयात नाहीत. मात्र, त्यांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. सध्या नगरची जागा भले राष्ट्रवादीकडे राहू किंवा भाजपला जाऊ, त्या जागेसाठी महायुतीतून स्व. अरुणकाका जगताप यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. बुधवारी सचिन जगताप यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला गेला. त्यामुळे जगताप रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासाठीही उमेदवारी अर्ज घेतला गेला आहे. महाविकास आघाडीकडून ससाणे यांच्याशिवाय तुल्यबळ उमेदवार सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे, सचिन अरुणकाका जगताप आणि करण जयंतराव ससाणे ही लढत झालीच, तर जणू एका ऐतिहासिक राजकीय संघर्षालाच पुन्हा उजाळा मिळणार आहे.
सचिन जगताप यांच्यासाठी त्यांचे बंधू तथा आमदार संग्राम जगताप हे आग्रही असणार आहेत, तसेच, विखे कुटुंबाकडूनही स्व. अरुणकाकांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र सचिन जगताप यांना विरोध होण्याचे कारण नसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आग्रह केल्यास पक्षश्रेष्ठीही सकारात्मक भूमिका घेऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे मतांची संख्या तुलनेने कमी असली, तरी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारखा अनुभवी नेता ससाणे यांच्यासाठी ताकद उभी करू शकतो. तसेच, आमदार हेमंत ओगले हेदेखील ससाणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे ही लढत झाल्यास, ती राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेणारी ठरेल असे मानले जात आहे.
उमेदवारी अर्ज घेतला आहे. उमेदवारीसाठी इच्छुकही आहे. पक्षाने आदेश दिल्यास ही निवडणूक लढणार आहे. अनेक तालुक्यांतून नगरसेवकांचा आग्रह असून, इतरांशीही संवाद सुरू आहे. पक्ष निर्णय घेईल, त्यानुसार भूमिका ठरवू.करण जयंतराव ससाणे
विधान परिषद निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. अर्ज नेला आहे. मात्र राजकीय समीकरणे कशी बनतात, काय घडामोडी होतात, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. ही जागा स्व. काकांची असल्याने उमेदवारीवर आमचा दावा आहेच.सचिन अरुणकाका जगताप