Ahilyanagar Municipal Elections Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Mayor Election: अहिल्यानगर महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव; नवे समीकरण की अनुभवी नेतृत्व?

जगताप–विखे पाटील धक्कातंत्र वापरणार की जुने जाणतेच निवडणार, नगरकरांची उत्सुकता शिगेला

पुढारी वृत्तसेवा

नगर: आरक्षित महापौरपदासाठी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील धक्कातंत्राचा अवलंब करून नवे समीकरण उदयाला आणणार, की अनुभवी जुन्या जाणत्यांवरच विश्वास टाकणार का, याबाबत शहरासह जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे. इच्छुकांच्या पतिराजांनी त्यादृष्टीने दोघांकडेही ‌‘लॉबिंग‌’ सुरू केले आहे. मात्र गटनेत्यांच्या निवडीसारखाच हा निर्णयही ते अखेरच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यातच ठेवतात का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी युती झाली. तर, शिवसेना शिंदे गट स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. जागावाटपात मोठ्या प्रमाणात तानाताणी झाल्याने शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 27 व भाजपला 25 जागा मिळाल्या. गुरुवारी दि. 22 रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर केली. त्यात अहिल्यानगरचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला.

आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आमदार जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी आणि भाजप युती करून निवडणुकीला सामोरे गेले. त्यात निर्भेळ यश मिळाले आहे. आता एकत्रित बसून महापौर पदाचा उमेदवार ठरविणार आहोत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमचे सगळे ठरलेले आहे, असे वक्तव्य केल्याने नगरकर संभ्रमात पडले आहेत.

महापौर राष्ट्रवादीचाच होणार अशी अटकळ बांधली जात आहे. त्यात महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादीकडून सर्वाधिक उमेदवार इच्छुक आहेत. तर, भाजपाकडे मोजकेच ओबीसी महिला प्रवर्गातील चेहरे आहेत. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार, महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची नगरकरांना उत्सुकता आहे.

अनेक इच्छुकांच्या आशेवर फेरले पाणी

महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिलेला निघाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी महापौर गणेश भोसले, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांची नावे चर्चेत होती. भाजपकडून ॲड. धनंजय जाधव, निखील वारे, बाबासाहेब वाकळे यांची नावे चर्चेत होती. आता त्यांचा हिरमोड झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT