

नेवासा : छत्रपती संभाजीनगरहून अहिल्यानगरमार्गे पुण्याकडे नव्याने रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी अनेक लोकप्रतिनिधी व प्रसारमाध्यमांनी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. परंतु आद्यप हा मार्ग केवळ कागदोपत्री असून प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, तसेच प्रस्तावित रेल्वेमार्गासठी विस्थापित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे पुनर्वसन करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचे युवा नेते अनिल ताके यांनी सांगितले.
हा मार्ग छत्रपती संभाजीनगरहून शनिशिंगणापूर, वांबोरी मार्गे अहिल्यानगर असा जाणार आहे. यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाा असून, ज्या मार्गाची आपण प्रतीक्षा करीत आहोत, तो मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर ते वांबोरी (राहुरी) हा 22 किलोमीटरचा रेल्वेमार्गास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. सदरील रेल्वेमार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी अधिसूचना प्रकाशित झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे, त्यांच्या हरकती श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयाकडे तीस दिवसांत नोंदवाव्यात असे कळविले आहे. परंतु भूसंपादन करताना सर्व विस्थापित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करा. म्हणजे या प्रास्तवित रेल्वेमार्गाला अडचणी येणार नाही, असेही ताके यांनी स्पष्ट केले.
एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होत आहे, त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबतीत आग्रही मागणी मांडली, तर हा रेल्वेमार्गही पूर्ण होऊ शकतो, असेही ताके यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरवरून केवळ साधारण 70 ते 80 किलोमीटर अंतर शनिशिंगणापूरचे इथपर्यंत रेल्वेमार्ग करणे गरजेचे आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, श्री क्षेत्र देवगड ,नेवासा फाटा, शनिशिंगणापूर, वांबोरी अहिल्यानगरमार्गे आपण पुण्यास सुलभरित्या जाऊ शकतो.