Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Mayor Election: अहिल्यानगर महापौरपदावर कोणाची लॉटरी?

ओबीसी महिला राखीव पदामुळे राष्ट्रवादी-भाजपमध्ये सस्पेन्स शिगेला

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर: ओबीसी महिलेसाठी राखीव निघालेल्या महापौर पदाच्या खुर्चीवर कोणाची लॉटरी लागणार याची उत्सुकता अहिल्यानगरांना लागली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत 27 जागा जिंकत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष बनलेला असला तरी भाजपकडे 25 चे संख्याबळ आहे. त्यामुळे महापौर कोणाचा अन्‌‍ कोण याचा सस्पेन्स स्थानिक नेत्यांनी ठेवल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राष्ट्रवादी आणि भाजप युती करीत निवडणुकीला सामोरे गेले. नगरकरांनी युतीला स्पष्ट बहुमत दिले. प्रत्येक वेळी त्रिशंकू होणारी महापालिका निवडणूक यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना भरघोस बहुमत दिले. महापौर राष्ट्रवादीचाच असेल अशी चर्चा रंगत आहे. मात्र, महापौर कोणत्या पक्षाची याची स्पष्टता स्थानिक नेते अद्यापह करत नाहीत. पहिल्यादा एकत्रित मिटिंग घेऊन महापौर पदाचा उमेदवार ठरवू असे सांगितले. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री निर्णय घेतील असे सांगितले. त्यामुळे महापौर पदाचा सस्पेन्स कायम आहे.

पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती देणार

महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून दीपाली बारस्कर, ज्योती गाडे, संध्या पवार, सुजाता पडोळे, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे, सुनीता फुलसौंदर, आशा डागवाले यांची नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती देणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. महापौर पदाचा उमेदवार ठरवताना कोणती नियमावली लावली जाणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. एक/दोन अपवाद वगळता अन्य नगरसेविका पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी अनुभवी नगरसेविकांना संधी देणार की नवख्याला पसंती देणार हे आता येत्या काही दिवसांत पहायला मिळणार आहे. दीपाली बारस्कर सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या उमेदवार आहेत. त्यांची तिसरी टर्म आहे. मात्र, पहिल्यांदा त्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीकडून दोनदा निवडून आलेल्या आहेत.

गीतांजली काळे

मुळ भाजपच्या मात्र पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या गीतांजली सुनील काळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांनी उपमहापौर पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. त्यांचे पती सुनील काळे हे आ. संग्राम जगताप यांचे निकटवर्तीय मानले जातात. महिला राखीव खुल्या जागेतून त्या निवडून आल्या असल्या तरी कुणबीमुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

आशा डागवाले

आशा डागवाले यांचेही नावा महापौर पदाच्या शर्यतीत आले आहे. त्यांचे पती किशोर डागवाले हे पाच टर्म नगरसेवक होते. यंदा मात्र त्यांनी पत्नीला संधी दिली. आ. जगताप यांच्या पुढाकारातून डागवाले यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केला. किशोर डागवाले हे अनुभवी असून आ. जगताप यांच्याशी त्यांचे सख्य आहे. पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या डागवाले यांना संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे.

वर्षा काकडे

महापौर पदाच्या चर्चेत वर्षा काकडे यांचे नावही आघाडीवर आहे. त्या केडगाव उपनगरातून निवडून आल्या आहेत. केडगाव उपनगरामध्ये राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी त्यांना महापौर पदाची संधी दिली जाऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे.

सुनीता फुलसौंदर

सुनीता फुलसौंदर या पहिल्यादांच निवडून आल्या असल्या तरी त्यांचे पती भगवान फुलसौंदर हे माजी महापौर आहेत. पूर्वी शिवसेनेत असलेले फुलसौंदर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत आले अन्‌‍ विजयी झाले. आ. जगताप यांचे वास्तव्य असलेल्या सारसनगर भागातून त्या निवडून आल्या आहेत.

संध्या पवार

संध्या पवार यांच्याकडे सर्वाधिक अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेविका म्हणून पाहिले जाते. संध्या पवार यांची तिसरी टर्म आहे. त्यांचे पती बाळासाहेब पवार हेही माजी नगरसेवक असून आमदार संग्राम जगताप यांचे ते एकनिष्ठ मानले जातात. त्यामुळे महापौर पदाच्या इच्छुकांमध्ये त्यांचे नाव वरच्या स्थानावर असल्याची चर्चा आहे.

ज्योती गाडे

ज्योती गाडे यांची दुसरी टर्म आहे. त्या मूळ राष्ट्रवादीच्या असून आ. जगताप यांच्या नातलग असल्याने महापौर पदासाठी त्याही दावेदार मानल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT