नगर: महायुती होणार असल्याचे निश्चित असले तरी जागावाटपाचा गुंता सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. दरम्यान, जागावाटपाकडे फारसे लक्ष न देता संभाव्य उमेदवारांना प्रचाराचे आदेश देण्यात आले आहेत. इच्छुकांचे ‘लोंढे’ पाहता भाजप, सेनेच्या दोघा विद्यमानांचा पत्ता कट झाल्याचे समोर आले असून ठाकरे सेनेचे दोघे भाजपच्या गळाला लागले आहेत. या राजकीय उलथापालथीत केडगावचे राजकारण बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने ‘कमळ’ फुलविण्याची चाल खेळल्याचे स्पष्ट होऊ पाहत आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. सुरुवातीला महायुतीचे काय होणार याची उत्सुकता होती, मात्र भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेची महायुती होणार हे स्पष्ट झाल्याने आता जागावाटपाकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे. जागावाटपावर तिन्ही पक्षांचे दोन दिवसांत एकमत झालेले नाही. पण चर्चा सुरूच आहे.
दरम्यान, जागावाटपाला फारसे महत्त्व न देता ज्या त्या पक्षाने संभाव्य उमेदवारांना प्रचाराचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळेच बहुतांश प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्राप्त माहितीनुसार भाजपकडे इच्छुकांचे ‘लोंढे’ असल्याने त्यांचे पुनवर्सन प्रभाग 9 आणि 11 मध्ये करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतले आहे. त्यामुळे या भागातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. प्रभाग 9 मधील चारही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. मात्र इच्छुकांचे ‘लोंढे’ वाढल्याने शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले, तरी 30 तारखेला हे चित्र स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
केडगावात भानुदास कोतकर समर्थकांनी भाजपकडे मुलाखती देत उमेदवारी मागितली आहे. भाजपच्या निष्ठावंतांनी कोतकर समर्थकांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच मंगळवारी रात्री शिवसेनेचे (उबाठा) दोन विद्यमान नगरसेवक भाजपच्या संपर्कात आले आहेत. या दोघांनाही भाजपने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे केडगावच्या 16 नंबर वार्डात भाजपच्या दोन संभाव्य उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित झाल्याचे मानले जाते. पण एबी फॉर्म मिळेपर्यंत राजकीय समीकरणे आणखी बदलू शकतात, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र केडगावातील कोतकरांच्या प्रभावाला सुरूंग लावण्यासाठी ‘लोकप्रतिनिधी’ने ही फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
आमदारांकडून महायुतीचा पुनरुच्चार
महायुती म्हणूनच महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा पुनरुच्चार आ. संग्राम जगताप यांनी पटवर्धन चौकात आयोजित कार्यक्रमात केला. आ. जगताप यांनीच महायुतीचे संकेत दिल्याने जागावाटपाचा गुंता सुटणार असल्याचे मानले जाते. जागावाटपात इकडे-तिकडे होईल, पण महायुती होईल. महायुतीत कोणाची उमेदवारी कोणाला, याची उत्सुकता मात्र 30 डिसेंबरपर्यंत कायम असेल.
भाजपची बाजी; धनंजय जाधवांचा अर्ज दाखल
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यातही भाजपने बाजी मारली आहे. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी प्रभाग पाचमधील ओबीसी राखीव जागेवर एक अपक्ष व दुसरा भाजपचा अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या अर्जासोबत एबी फॉर्म नाही; पण भाजपकडून एबी फॉर्म एकत्रितपणे बंद पाकिटात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
1164 इच्छुकांनी नेले अर्ज
दरम्यान, दोन दिवसांत 1164 इच्छुकांनी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पहिल्या दिवशी 780, तर दुसऱ्या दिवशी 384 अशा 1164 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.