नगर: महायुती म्हणून महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घोषित केला खरा पण जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इच्छुकांची झोपमोड झाली आहे. मुंबईतील पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील तोडगा काढून महायुतीची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या 68 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला तरी राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपात जागा वाटपावर एकमत झाले नाही. परिणामी जागा वाटपाचा विषय थेट मुंबईत पोहचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी चर्चा करत राजकीय पट मांडणी केली.
शिवसेनेने 29, राष्ट्रवादी 32 आणि भाजपने 30 जागांवर दावा केल्याने जागा वाटपाचा गुंता सुटण्याऐवजी तिढा निर्माण झाला. जागा वाटपावर तोडगा निघत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. उमेदवार मिळणार की नाही या धास्तीने इच्छुकांच्या झोपा उडाल्या आहेत.
दरम्यान काहींनी दोन्ही डगरीवर हात ठेवत भाजप व राष्ट्रवादी दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभागात सहकारी उमेदवार कोण हे निश्चित होत नसल्याने जो तो वैयक्तिकरित्या प्रचाराला लागला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सोमवार आणि मंगळवार दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. रविवारी महायुतीचे जागा वाटप ठरून महायुतीची घोषणा होईल अन् त्यानुसार उमेदवारांना निरोप दिले जातील. पक्षाचे एबी फॉर्म इच्छुकांच्या हातात न देता थेट बंद पाकिटात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले जातील. बंडखोरी टाळण्यासाठी ‘बंद पाकिटा’चा निर्णय महायुतीतील तिन्ही पक्षांनी घेतल्याचे समजते.