नगर: बळीराजाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘महाविस्तार एआय’ हे ॲप कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाले असून, एक मोबाईल ॲप न राहता, शेतकऱ्यांसाठी हे एक चालतं-फिरतं कृषी विद्यापीठच ठरत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक ॲपचे वापरकर्ते शेतकरी निर्माण करण्यात आल्यामुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या ॲपच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची जिल्ह्यात मोहीम सुरु आहे.
‘महाविस्तार एआय’च्या माध्यमातून आता जमिनीची मशागत, बियाणे निवड, खत व्यवस्थापन व सिंचनाचे नियोजन आदींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. या ॲपमध्ये ‘एआय चॅटबोट’. हा चॅटबोट शेतकऱ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधत आहे.
या ॲपमुळे शेतकऱ्यांना तापमानातील बदल, पर्जन्यमान व आर्द्रता याची तत्काळ माहिती मिळत असून, पिकांचे बाजारभाव व बाजारातील स्थिती समजल्याने शेतकऱ्याला पीक कापणी व विक्रीचे नियोजन करणे सोपे होत आहे. कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती व त्यासाठी लागणारी पात्रता या ॲपवर उपलब्ध आहे. इच्छुक योजनेसाठी थेट ॲपमधूनच अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
मोबाईल नंबर वा फार्मर आयडी वापरून नोंदणी
कृषी अधिकारी, सहाय्यक व प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयुक्त असून, गुगल प्ले स्टोअरवरून ‘चरहर्रींळीींरी -ख’ डाऊनलोड करून, आपला मोबाईल नंबर किंवा फार्मर आयडी वापरून नोंदणी करता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.