

संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावा, अशी सुरुवातीपासूनची माझी ठाम भूमिका आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे सांगत, नागपूर हिवाळी अधिवेशनात याप्रश्नी आवाज उठविणार आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. दरम्यान, काहीजण रेल्वे मुद्यावर नाहक राजकारण करून, आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता लगावला.
नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरवरूनच व्हावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्र्यांनी जीएमआरडीचा तांत्रिक अहवाल सादर करुन, लोहमार्ग बदलण्याचा निर्णय जाहीर केला.
मात्र तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, पर्यायी ट्रॅक तयार करून, मार्ग बदलणे पुर्णतः शक्य आहे, असे सांगत, आमची बांधिलकी जनतेशी आहे. यामुळे हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हायला हवा, याबाबत आमची भूमिका आजही ठाम आहे, असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारचा या प्रकल्पात 50 टक्के वाटा असल्याने संगमनेरवर अन्याय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, वेळ आल्यास महायुतीतर्फे जनतेच्या हितासाठी राजकारणविरहित जन आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाक्चौरे यांनी, पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत ठाम भूमिका घेणे आवश्यक होते, मात्र त्यांनी लोकसभेत या विषयावर भूमिका मांडली नाही. यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटते.
आमदार अमोल खताळ, संगमनेर.