नगर तालुका: प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेस माहेरी बोलावून घेत तिला नांदण्यास पाठवण्यास नकार दिला. तसेच तिच्या आई-वडिलांनी वारंवार छळ केला. या जाचास कंटाळून अहिल्यानगर येथील 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृत्यू झालेल्या तरुणाच्या बहिणीने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचे वडील आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय अशोक उमाप (रा.सर्जेपुरा, अहिल्यानगर) याचा आणि प्रेरणा (नाव बदललेले) यांचा 4 एप्रिल 2025 रोजी पुण्यात प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या आई-वडिलांचा या विवाहास विरोध असल्याने ते लग्नाला आले नव्हते. लग्नानंतर हे दाम्पत्य सर्जेपुऱ्यातील आजीच्या घरी एकत्र राहत होते.
ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या भाऊबीजेसाठी अक्षयची बहीण आकांक्षा पवार हिने दोघांनाही पिंपळगाव माळवी येथील घरी बोलावले होते. त्याच दिवशी सायंकाळी प्रेरणाचे आई-वडील तिथे आले आणि त्यांनी ’पहिली दिवाळी असल्याने तिला माहेरी पाठवा, दोन दिवसांनी परत आणून घालतो,’ असे सांगून मुलीला सोबत घेऊन गेले.
त्यानंतरही त्यांनी प्रेरणाला नांदायला पाठवले नाही. अक्षय व त्याच्या बहिणीने फोन करून विचारणा केली असता, ’आम्ही तिचे दुसरे लग्न जमवले आहे, तुम्ही फोन करू नका,’ असे धमकावले. अक्षयने पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ’मला घरच्यांनी बाहेरगावी लपवून ठेवले आहे,’ असे तिने संदेशाद्वारे सांगितले.
नोव्हेंबरमध्ये अक्षय पत्नीला आणण्यासाठी तिच्या माहेरी नेवासा तालुक्यात येथे गेला असता, तिच्या आई-वडिलांनी त्याला मारहाण करत हाकलून दिले. 3 डिसेंबरलाही तो पत्नीला भेटण्यासाठी गेला असता, पुन्हा त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याला पत्नीला भेटू दिले नाही.
या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून, अक्षयने 4 डिसेंबर रोजी दुपारी सर्जेपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने चिठ्ठी आणि व्हिडिओ क्लिपमध्ये प्रेरणाच्या आई-वडिलांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे. सुनील मंडलीक, ज्योती मंडलीक यांची फिर्यादीत आरोपी म्हणून नावे टाकण्यात आली आहे.