धांदरफळ शिवारात अडकले एकाच पिंजऱ्यात नर-मादी
संगमनेर: तालुक्यातील धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी, मिर्झापूर शिवारात धुमाकूळ घालणारे मादी आणि नर दोन बिबटे एकाच पिंजऱ्यात जेरबंद झाले. मात्र या परिसरात अजून एक बिबट्या असून त्याचाही तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जवळे कडलग येथील सिद्धेश कडलग या चार वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर तालुक्यात असंतोष पसरला. परिणामी तालुक्यात ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबटे पकडले जात आहेत. धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी आणि मिर्झापूर परिसरातही बिबट्यांचा वावर असल्याने पिंजरे लावले आहेत. मिर्झापूर परिसरातील 3 ते 4 बिबटे धुमाकूळ घालत आहेत. तेथे पंढरीनाथ संपत वलवे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी नर व मादी बिबट्यांची जोडी अडकल्याचे निदर्शनास आले. या बिबट्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे संगमनेर खुर्द येथील नर्सरीत हलविले आहे. या परिसरात अजूनही आठ ते दहा बिबटे असण्याची शक्यता असून, त्यांचाही बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तालुक्यातील बिबटप्रवण क्षेत्रात सुमारे 30 ते 35 कर्मचारी व अधिकारी ड्रोनच्या साह्याने बिबट्यांचा शोध घेत आहेत.
देवळाली प्रवरा येथे बिबट्याचा विहिरीत मृत्यू
राहुरी: देवळाली प्रवरा परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील रामचंद्र तांबे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बुधवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. तो भक्षाच्या शोधात तीन-चार दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तो फुगून पाण्यावर तरंगत होता. वंचितचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे रायकर व टीमने बिबट्याचा मृतदेह वर काढून शवविच्छेदन करून जाळून टाकला. दरम्यान, देवळाली प्रवरा परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या तसेच अनेक लोकांनी अतिक्रमण करून साईड गटारामध्ये लावलेल्या दाट गिन्नी गवतात लपून एखादा बिबट्या शालेय विद्यार्थी, नागरिक अथवा ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करू शकतो. त्यामुळे शहरातून गेलेला कालवा, चाऱ्या व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे तोडून गिन्नी गवत लावणाऱ्यांंवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
निमगाव खैरीत दुसरा बिबट्याही जेरबंद
श्रीरामपूर: तालुक्यातील खैरी निमगाव येथील दादासाहेब आप्पासाहेब येलम यांच्या पेरूच्या बागेत काही दिवसांपासून मुक्त संचार करणारा दुसरा बिबट्या बुधवारी पकडण्यात आला. वन विभाग व वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीमने ही संयुक्त कारवाई केली. येलम यांच्या शेतात मेंढपाळ आले होते. मात्र, येलम यांना त्याची माहिती नव्हती. दरम्यान, मेंढपाळाची एक शेळी बिबट्याने धरली; मात्र ती ओढून नेता न आल्याने तिला सोडून बिबट्याने कोकराला उचलून नेले होते. बिबट्या दिवसाढवळ्या अनेक नागरिकांना दिसत होता, तर रात्री शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करून नुकसान करत होता. येलम यांनी श्रीरामपूर वन विभाग तसेच वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर वनरक्षक अक्षय बडे, वनपाल विलास डगळे, रेस्क्यू टीमचे प्रा. रोहित बकरे, तुषार बनकर, अजित परांडे, सार्थक शिंदे व अक्षय अभंग यांनी घटनास्थळी पाहणी केली. पथकाने बिबट्याच्या पावलांचे ठसे शोधून दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला. सोमवारी सायंकाळी पिंजरा बिबट्याच्या भ्रमण मार्गातील दुसऱ्या ठिकाणी हलविला. अखेर बुधवारी पहाटे बिबट्या त्यात कैद झाला.
किन्ही येथील कुटुंबाला 25 लाखांची मदत
पारनेर: तालुक्यातील किन्ही येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भागूबाई विश्वनाथ खोडदे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत आमदार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. या मदतीमध्ये 10 लाख रुपयांचा धनादेश व 15 लाख रुपये ठेव (एफडी) स्वरूपात विश्वनाथ लक्ष्मण खोडदे यांचे नावे देण्यात आले. आमदार दाते या वेळी म्हणाले, की बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे, वनपाल के. एस. साबळे, वनरक्षक एन. व्ही. बडे व बी. एस. दवणे, चालक दिगंबर विरोळे आदी उपस्थित होते. दरम्यान, बिबट्यांच्या वाढत्या संचाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाशी समन्वय साधावा, असे आवाहन प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी केले आहे.
येसगावच्या निकोले कुटुंबीयांना 10 लाखांची मदत
कोळपेवाडी: येसगाव (ता. कोपरगाव) येथे नोव्हेंबरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शांताबाई अहिल्याजी निकोले (वय 60) यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत वन विभागातर्फे देण्यात आली. या मदतीचा धनादेश नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शांताबाई निकोले यांचा मुलगा संतोष निकोले यांना देण्यात आला. कोपरगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र निकोले या वेळी उपस्थित होते. शांताबाई यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर आ. काळे वीसच मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले होते. तेथून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून निकोले यांच्या वारसांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या घटनेच्या काही दिवस आधी टाकळी परिसरात ऊसतोडणी मजुराच्या चार वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले, तेव्हाही आ. काळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना फोन करून बिबट्यांचा बंदोबस्त व मृतांच्या वारसांना तातडीने मदतीची मागणी केली होती. या पाठपुराव्यातून वन विभागाने निकोले यांना दहा लाखांचा धनादेश व ऊसतोडणी कामगारांच्या मुलीच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती आ. काळे यांनी दिली.