शशिकांत पवार
नगर: केडगाव म्हणजेच कोतकर असे एकेकाळी असलेले समीकरण यंदाच्या महापालिका निवडणुकीनंतर पुरते नामशेष झाले. केडगाव बालेकिल्ल्यात मतदारांनी भानुदास कोतकरांचे नेतृत्व झुगारत आ. संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे युतीवर विश्वास दाखविला. केडगावचा हा निकाल कोतकरांसाठी धक्कादायक, तर आ. जगतापांसाठी दिलासादायक ठरला आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष लागलेल्या केडगाव येथील प्रभाग 16 व 17मध्ये भाजप व राष्ट्रवादी युतीच्या आठही उमेदवारांनी मिळविलेला विजय हा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे, तसेच शिंदे सेनेच्या उमेदवारांनाही येथे पराभव स्वीकारावा लागला.
केडगाव उपनगर ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. केडगावचे राजकारण नेहमीच कोतकर कुटुंबीयांभोवती फिरत आले आहे. उपनगरात बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी सर्वात अगोदर प्रचारास सुरुवात करून मोठी आघाडी घेतली होती. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोतकर यांनी निवडणुकीतून अचानकपणे माघार घेत असल्याची भूमिका जाहीर केल्याने उमेदवारांबरोबर मतदारांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यांच्या भूमिकेमुळे शिंदे सेनेलाही ऐनवेळी उमेदवारांचा शोध घेताना मोठी धावपळ करावी लागली. शिंदे सेनेची उमेदवारी कोतकर यांनी नाकारली. परंतु कोतकर समर्थकांनी आपले अपक्ष अर्ज ठेवले होते.
निवडणुकीनंतर प्रचार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला अलिप्त राहिलेले कोतकर प्रचारात सक्रिय झाले. कोतकर समर्थकांनी स्वाभिमानी केडगावकर साद घालत स्थानिक आघाडी तयार केली होती. त्या उमेदवारांचा भानुदास कोतकर यांनी स्वतः प्रचार करत मोठी चुरस निर्माण केली होती. शिंदे सेनेनेही येथे उमेदवार उभे केले होते. काही अपक्षही नशीब अजमावत होते. तिरंगी, तसेच बहुरंगी झालेल्या लढतीत भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार नगरसेवक निवडून आले. भाजप राष्ट्रवादीच्या युतीने कोतकरांच्या बालेकिल्ल्यात मिळविलेला विजय हा धक्कादायक मानला जात आहे.
केडगावमधील दोन प्रभागांतील आठ जागांसाठी तब्बल 39 उमेदवार रिंगणात उतरले होते. आ. संग्राम जगताप व माजी खा. सुजय विखे यांनी केडगाववर विशेष लक्ष केंद्रित करून महायुतीच्या उमेदवारांसाठी व्यूहरचना आखली होती. प्रचारादरम्यान माजी खा. विखे व आ. जगताप यांनी दोन्ही प्रभागांत विविध ठिकाणी सभा घेतल्या. त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. मतदानाच्या दिवशी प्रभाग 16 मध्ये 18 हजार 874 पैकी 13 हजार 100 मतदारांनी, तर प्रभाग 17 मध्ये 15 हजार 288 पैकी 10 हजार 180 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीदरम्यान स्वाभिमानी आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांत मतविभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीला झाल्याने त्यांचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
युतीचा झेंडा
केडगावात भाजप व राष्ट्रवादीचे आठही उमेदवार मताधिक्याने निवडून आल्याने भानुदास कोतकर यांचा गड नेस्तनाबूत झाल्याने केडगावच्या वेशीवर युतीचा झेंडा फडकला. कोतकर यांच्या आठही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.