

भेंडा: निधीची मागणी करून आणि आवश्यक ती सर्व पूर्तता करूनही पंधराव्या वित्त आयोगातील अनुदानाची रक्कम न मिळाल्याने नेवासा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींची कामे ठप्प झाली आहेत. या ग्रामपंचायतींची एकूण बंधित व अबंधित रक्कम 2 कोटी 29 लाख 65 हजार 654 रुपये इतकी केंद्र सरकारकडून येणे आहे.
नेवासा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन लोकनियुक्त प्रतिनिधींची नियुक्ती झालेली आहे. ई स्वराजवर अपलोड संस्था, सन 2022-23चे लेखापरीक्षण पूर्ण यासह सर्व अटीची पूर्तता झालेली असतानाही पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सन 2024-25 आर्थिक वर्षातील दुसरा हप्ता निधीची रक्कम मिळणे बाकी आहे. तालुक्यातील भेंडा बुद्रुक 23 लाख 31 हजार 144, भेंडा खुर्द 7 लाख 31 हजार 380, चिंचबन 2 लाख 28 हजार 425, देवगाव 14 लाख 24 हजार 253, देवसडे 4 लाख 44 हजार 800, गेवराई 9 लाख 18 हजार 941, जळके खुर्द 9 लाख 87 हजार 835, जळके बुद्रुक 5 लाख 36 हजार 486, खुपटी 5 लाख 99 हजार 354, म्हाळस पिंपळगाव 4 लाख 56 हजार 589, माळीचिंचोरा 13 लाख 55 हजार 621, मोरेचिंचोरा 6 लाख 22 हजार 407, बेलपिंपळगाव 14 लाख 10 हजार 369, बाभूळखेडा 4 लाख 32 हजार 227, बऱ्हाणपूर 4 लाख 67 हजार 329, बेल्हेकरवाडी 7 लाख 66, भानसहिवरा 19 लाख 26 हजार 684 हजार 407 हजार 744, बकूपिंपळगाव 3 लाख 51 हजार 20, रांजणगाव 8 लाख 23 हजार 326, पुनतगाव 5 लाख 88 हजार 615, सुरेगाव गंगा 5 लाख 27 हजार 55, शिरेगाव 5 लाख 25 हजार 745, शिंगवे तुकाई 6 लाख 49 हजार 650, तरवडी 10 लाख 671, उस्थळ दुमाला 10 लाख 89 हजार 735, उस्थळ खालसा 2 लाख 54 हजार 883, वरखेड 9 लाख 17 हजार 369, नवीन चांदगाव 3 लाख 32 हजार 683, फत्तेपूर 2 लाख 64 हजार 314 या ग्रामपंचायतींची सन 2024-25 आर्थिक वर्षातील एकूण 2 कोटी 29 लाख 65 हजार 654 रुपये निधी दुसऱ्या हप्ता रक्कम मिळावी अशी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांची मागणी आहे.
या ग्रामपंचायतीचा 2024-25 आर्थिक वर्षातील बंधित व अबंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे अनुदान त्वरित मिळणे अत्यावश्यक आहे. स्वच्छता व पाणीपुरवठासाठी बंधित निधीचा वापर करता येतो आणि रस्ते, शाळेचे कुंपण भिंत, रस्त्यावरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे, गटार बांधकाम व दुरुस्ती या व इतर कामासाठी अबंधित निधी वापरून विविध विकासकामे गाव पातळीवर करता येतात.
निकष पूर्ण न केलेल्या 15 ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे:
अंतरवाली, बहिरवाडी, चिलेखनवाडी, बेलपांढरी, गिडेगाव, जायगुडे आखाडा, गोमळवाडी, खेडले काजळी, लेकुरवाळी आखाडा, लोहारवाडी, महालक्ष्मी हिवरे, नांदूर शिकारी, नेवासा बुद्रुक, पाथरवाला, सुकळी खुर्द.
वरील प्रकारचे निधी नसल्याने तालुक्यातील सुमारे 44 ग्रामपंचायतींची कामे ठप्प झालेली आहेत. त्यापैकी 29 ग्रामपंचायतींनी परिपूर्ण पूर्तता करून व प्रस्ताव पाठवूनही त्यांनाही अनुदान न मिळाल्याने गाव पातळीवरील अनेक कामे प्रलंबित आहेत. हा निधी केंद्र सरकारकडून तातडीने मिळावा, अशी मागणीवरील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांकडून होत आहे.
शासन स्तरावरून निधी मिळत नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचे गैरसमज होत आहेत. राजकीय आकसापोटी व जाणीवपूर्वक कामे करत नसल्याचा आरोप द्वेष भावनेतून काही नागरिक व विरोधक करत आहेत.
सुहासिनी किशोर मिसाळ, सरपंच, भेंडा बुद्रुक