

संदीप रोडे
ज्येष्ठ नेते शरद पवारांचा ‘लाडला’ खासदार नीलेश लंके यांच्या ‘सौ’चा विधानसभेला पराभव केल्यानंतर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतही चारीमुंड्या चीत करत आमदार संग्राम (भैय्या) जगताप यांच्या साथीने डॉ. सुजय (दादा) विखे पाटील यांनी दुसरा जोराचा झटका देताना ‘तुतारी’चा आवाज बंद केला. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत लंकेंच्या पराभवाची हॅट्ट्रिक करण्याच्या दिशेने विखे पाटलांनी पाऊल टाकले आहे.
गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन विद्यमान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव करत नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे दिल्लीश्वर अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवारांचा ‘लाडला’ म्हणून स्थान मिळवले. निसटता म्हणजेच 28 हजार 929 मतांनी विखे पाटलांचा पराभव झाला असतानाही बलाढ्य, मातब्बर विखे पाटलांचा पराभव करणारे लंके हे राज्यच नव्हे, तर देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. ‘तो’ पराभव जिव्हारी लागलेले डॉ. सुजय विखे पाटील दुसऱ्या दिवसापासून लंके यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करायला लागले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत काशिनाथ दाते यांच्या पाठीशी ताकद उभी करत विखे पाटलांनी सौभाग्यवती लंके यांचा पराभव करतानाचा त्यांना ‘रसद’ पुरविणारे बाळासाहेब थोरात यांचाही त्याचवेळी पराभव करत डॉ. विखेंनी दुहेरी आनंद तथा विजयोत्सव साजरा केल्याचे नगरकरांच्या अजूनही स्मरणात आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीची युती करत डॉ. सुजय विखे पाटलांनी आ. संग्राम जगताप यांच्या हातात हात घातला. दादा-भैय्याच्या या जोडगोळीने उमेदवारी देण्यापासून ते विजयोत्सवापर्यंत अत्यंत सुक्ष्म नियोजन केले. कोणतीही कसर न ठेवता विरोधकांना संधी मिळणार नाही, याची पुरेपूर काळजी या ‘दोस्तांनी’ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने ‘मैत्रिपर्वात’ उत्साह संचारला. परिणामी फिफ्टी प्लसचा आकडा पार करत अभूतपूर्व यश मिळविले. दादा-भैय्यांनी अभूतपूर्व यश मिळवण्यासोबतच खा. लंके नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडीचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी आखलेल्या व्यूहनीतीला नगरकरांनीही मत‘वाण’ देत पाठबळ दिले. काँग्रेस-उबाठा सेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे नेतृत्व लंके-कळमकर जोडगोळीच्या हाती होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेले ‘ते प्रकार’ हे ‘एनकॅश’ करण्याची संधीही लंके-कळमकरांनी दवडली, हेच या निकालातून सिद्ध झाले.
खरे तर विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिलेदार अभिषेक कळमकर यांना 79 हजार मते पडली होती. अर्थातच ही मते राष्ट्रवादी-भाजप विरोधातील होती. लंके-कळमकर जोडीने विधानसभेपासूनच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अहिल्यानगरची मोर्चेबांधणी करत ‘परफेक्ट प्लॅनिंग’ केले असते तर या मतांमध्ये वाढ होऊन महापालिकेचा आज लागलेला निकाल कदाचित वेगळा लागला असता. लंके-कळमकर जोडीने रणनीतीत बदल करतानाच आ. जगताप यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका, शिवसेनेला महायुतीतून ऐनवेळी दाखविलेला कात्रजचा घाट यावर मुद्द्यावर फोकस करणेही शक्य होते, पण या दोघांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष, अनुभवी दादा कळमकर पाठीशी असतानाही आलेले अपयश आणि राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांनी नगरकडे केलेले दुर्लक्ष...
या सगळ्यांची परिणती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीचा आवाज बंद पडण्यात झाली. ‘तुतारी’ला भोपळाही फोडता न आल्याचा दुसरा विजयोत्सव डॉ. विखे पाटलांनी आ. जगताप यांच्या मदतीने जल्लोषात केला. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विखे पाटील हे पारनेरवर लक्ष केंद्रित करतील आणि लंके यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक साजरी करत लोकसभेच्या पराभवाचा बदला घेतील. त्यादृष्टीने डॉ. विखे पाटील हे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या ऑपरेशनच्या तयारीला लागल्याचे त्यांचेच निकटवर्तीय सांगताहेत. हे खरे की खोटे, हे येणारा काळ आणि होणाऱ्या निवडणुकांतूनच स्पष्ट होईल...