

बोधेगाव: पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकत सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. बोधेगावातील बाडगव्हाण रस्त्यालगत असलेल्या खिळे वस्ती व वैद्य वस्तीवर मकरसंक्रांतीच्या दिवशी बुधवारी मध्यरात्री हा दरोडा पडला. तलवारीसह शस्त्रांचा धाक दाखवत दरोडेखोरांनी महिला-पुरूषांना केलेल्या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांचे वडील पांडुरंग वैद्य हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
पांडुरंग वैद्य, रुख्मिणी वैद्य आणि संगीता खिळे, भीमराव अकोलकर अशी जखमी तिघांची नावे आहेत. बाडगव्हाण रस्त्यालगत कचरू श्रीपती खिळे हे शेतवस्ती राहतात. मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी अप्पासाहेब कचरू खिळे यांच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करण्यापूर्वी शेतवस्तीवरील पाळीव कुत्र्यांना गुंगीचे औषध देत दरोडेखोरांनी डाव साधला. खिळे यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून पती-पत्नीला जबर मारहाण करत पत्नीच्या अंगावरील दागिने ओरबाडले. कपाटातून रोकड व सोने-चांदीचे दागिने लुटल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांचे मोबाईल फोडल्यानंतर घराच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावत पसार झाले.
त्यानंतर दरोडेखोर शेजारीच दोनशे फुटावर असलेल्या कचरू खिळे यांच्या वस्तीवर पोहचले. घराबाहेर झोपलेल्या कचरू खिळे यांना मारहाण करून दरवाजा तोडत दरोडेखोर घरात घुसले. मुलगा परमेश्वर व मोहन यांच्या गळ्याला चाकू लावत महिला व मुलांना मारहाण केली. धारदार शस्त्राचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील तसेच कपाटातील सोने-चांदीचा ऐवज लुटला. कानातील झुंबर ओढल्याने संगीता खुळे यांचा कान फाटला. त्यानंतर दरोडेखोर पोलिस कर्मचारी वैद्य यांच्या घराकडे वळाले. अप्पासाहेब वैद्य हे नेवासा पोलिस ठाण्यात कार्यरत असून बोधेगावात त्यांचे वडिल पांडुरंग व आई रुख्मिणी राहतात. दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून पांडुरंग व रुख्मिणी वैद्य यांना जबर मारहाण केली. घरातील रोकड व सोन्या चांदीचे दागिने लुटत दरोडेखोर पसार झाले. वैद्य यांच्या वस्तीवरील आरडा ओरड ऐकून शेजारीच राहणारे भीमराव अकोलकर मदतीला धावले. दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. जाताना दरोडेखोरांनी अंकुश शांतवन खंडागळे यांच्या घरातही प्रवेश करत रोकड लंपास केली. पोलिस उपअधीक्षक राजगुरू यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे हे घटनास्थळी पोहचले. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दिवसभर पोलिस दरोडेखोरांचा माग शोधत होते.
दरोडेखोरांच्या तावडीतून थेट पोलिस चौकीत पण पोलिसाचा पत्ताच नाही!
कचरू खिळे यांच्या वस्तीवर दरोडा पडल्यानंतर त्यांचा मुलगा परमेश्वर हा दरोडेखोरांची नजर चुकून तेथून पळाला. रात्रीच्या अंधारात जीवाच्या भितीने ते पळत बोधेगाव पोलिस चौकीत पोहचले. त्यावेळी चौकीत एकही पोलिस उपस्थित नव्हता. त्यांनी ही दरोड्याची माहिती शेवगाव पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिस बोधेगावात पोहचले, पण तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.
दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद
अहिल्यानगर येथून बोधेगावात दाखल झालेल्या श्वान पथकाने दरोडेखोरांचा माग दाखविल्याचे समजते. तसेच एक वस्तीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाला आहे.
चौकीतील पोलिस शेवगावात
बोधेगाव पोलिस चौकीत एक उपनिरीक्षकासह पाच कर्मचारी नियक्तीला असल्याचे समजते. मात्र यातील एकही पोलिस तेथे प्रत्यक्षात नसतात. त्यांना शेवगाव येथे ड्युटी लावली जाते. त्यामुळे पोलिस चौकी असून नसल्यासारखीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.