नगर: जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींची फेब्रुवारी अखेर मुदत संपणार आहे. लवकरच त्यांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवरच काल ‘बंधीत’चा कोट्यवधींचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून, मुदत संपणाऱ्या सरपंच आणि सदस्यांना पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी ‘खर्च’ करण्याची ही आयती संधी चालून आल्याचे बोलले जाते. या खर्चावर जिल्हा परिषद प्रशासनाचा विशेष वॉच असणार आहे.
पंधराव्या वित्त आयोगांर्तगत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा पहिला हप्ता नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील 1128 ग्रामपंचायतींना 61 कोटींचा निधी मंजूर झाला असून, जिल्हा परिषदेतून तो वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निधीतून ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीनही स्तरांसाठी दरवर्षी बंधितचे दोन आणि अबंधितचे दोन अशा चार टप्प्यात निधी दिला जातो. ग्रामपंचायतींना 80 टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 10 टक्के निधी वाटप केला जातो. सन 2025-26 च्या पहिल्या बंधित हप्त्यापोटी केंद्राकडे राज्यासाठी 1075 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील 1218 ग्रामपंचायतींना 61 कोटी 71 लाख 84 हजार 312 रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र, बंधित निधी हा स्वच्छता आणि हागणदारीमुक्त देखभाल दुरुस्तीसाठी करायचा आहे.
पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिग, वॉटर रिसायकलिंगवरही हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. दि.10 फेब्रुवारी 2026 पर्यंत किमान 50 टक्के हा निधी खर्च करायचा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासक असल्याने त्यांना या टप्प्यातही निधी मिळालेला नाही. निवडणुकीनंतरच त्यांना निधी मिळणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांच्या टीमव्दारे हा निधी ग्रामपंचायत खात्यात वर्ग केला जात आहे. रात्री उशीरापर्यंत बीम्स प्रणालीव्दारे ही कार्यवाही सुरू होती.
‘त्या’ ग्रामपंचायती वेटींगवरच
जिल्ह्यात 1327 ग्रामपंचायती आहेत. यापैकी 1218 ग्रामपंचायतींनाच निधी मिळाला आहे. मात्र उवर्रीत 109 ग्रामपंचायतींना दमडीही मिळालेली नाही. मुदत संपणे, प्रशासक असणे किंवा लेखापरीक्षण पूर्ण नसणे, यासह इतर एका कारणामुळे हा निधी रोखून ठेवण्यात आला आहे.