Ahilyanagar Ganeshotsav Meeting Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Ganeshotsav: अहिल्यानगरात ‘व्यसनमुक्त गणेशोत्सवा’चा संकल्प; DJ वाजविताना नियम मोडल्यास कारवाई

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे गणेश मंडळांना आवाहन; सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच DJ, लेझर-प्लाझ्मा साउंडला मनाई

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्‍यानगर शहरात गणेशोत्‍सव साजरा करताना सर्वच गणेश मंडळांनी नियमाचे पालन करावे. मिरवणुकांत नशा करणार्‍या युवकांची संख्‍या अधिक आढळून येत आहे. त्‍यामुळे अहिल्‍यानगरातील ‘व्‍यसनमुक्‍त गणेशोत्‍सव’ असा आदर्श राज्‍याला घालून देण्‍याचा प्रयत्‍न गणेश मंडळांनी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. सर्वोच्‍च न्‍यायालयाने घालून दिलेल्‍या गाईडलाईननुसारच डिजेचा वापर व्‍हावा अन्‍यथा कारवाई अटळ असल्‍याचा इशारा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिला.

गणेशोत्‍सवाच्‍या पार्‍श्वभूमीवर जिल्‍हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१) सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी महापौर ज्‍योती गाडे, जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त यशवंत डांगे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आदींसह पोलिस अधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्‍य व राजकीय पदाधिकारी उपस्‍थित होते.

या बैठकीत गणेश मंडळाच्‍या पदाधिकार्‍यांनी विसर्ग मार्गावरील रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती करावी, डिजेवर नियमानुसारच कारवाई व्‍हावी, देखावे बघण्‍यासाठी मोठ्या संख्‍येने नागरिक येतात. त्‍यामुळे ठिकठिकाणी फिरते शौचालये उभारण्‍यात यावीत, गणेश मंडळांना आवश्‍यक परवानग्‍या घेण्‍यासाठी एकाच ठिकाणी कक्ष उभारण्‍यात यावा अशा विविध सूचना गणेश मंडळांच्‍या पदाधिकार्‍यांनी बैठकीत केल्‍या. गणेशोत्‍सव काळात रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती केली जाईल, फिरते शौचालये उभारण्‍यात येईल असे आश्‍वासन यावेळी महापालिका आयुक्‍त डांगे यांनी दिले.

डिजेवर कारवाई करताना वाहने जप्‍त केली जातात. सहा सहा महिने वाहने सोडविण्‍यासाठी पोलिस ठाण्‍याला चकरा माराव्‍या लागत आहेत. त्‍यामुळे कारवाई करताना मालकावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली. प्रत्‍येक पोलिस स्‍टेशनच्‍या हदृीत गणेश मंडळांच्‍या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली जाऊन तेथील प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल.

लेजर व प्‍लाज्‍मा साऊंड सिस्‍टिमला मनाई असल्‍याचे पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले. यावेळी भाजपचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक निखील वारे, विक्रम राठोड आदींसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच विचार भारतीचे पदाधिकारी उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT