गोरक्ष शेजूळ
नगर: पावसाळा सुरू होऊन तीन महिने संपली, तरीही अद्याप दमदार पाऊस नसल्याने जिल्ह्यात ६९२ पाझर तलाव कोरडे पडले आहेत, ८०० हून अधिक कोल्हापूर पद्धतीचे, साठा बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. २५१५ पेक्षा छोटे-मोठे तलाव, बंधारे कोरडे झाल्याने त्यावर अवलंबून असलेले सुमारे ४१ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. याशिवाय जनावरांचा चारा, पाणीप्रश्नही ऐरणीवर आला आहे. पुढच्या रब्बीचे भवितव्यही धूसर असून, यंदाच्या भीषण दुष्काळाची ही चाहूल समजली जात आहे.
जिल्ह्याला जूनपासून पावसाळा अनुभवयाला मिळतो. मात्र, यंदा सप्टेंबरही अर्धा संपत आला तरीही अद्याप दमदार पाऊस नाही. या साडेतीन महिन्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे. तलावातील आहे ते पाणीही संपले आहे. काही ठिकाणी थोडेफार शिल्लक आहे, त्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी लागणार आहे. त्यामुळे जनावरांचा चारा-पाणी आणि त्यानंतर शेतीसाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न उभा राहिला आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग, तसेच राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभागांर्गत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे २११, पाझर तलाव ६९१, गाव तलाव ८, साठवण बंधारा २३९, साठवण तलाव ४२, सिमेंट बंधारा १३२४ आहेत. त्याची पाणी साठवण क्षमता २१५ दलघमी पेक्षा अधिक आहे. मात्र यंदा पाऊस नसल्याने ही बंधारे कोरडीठाक पडली आहे. काही ठिकाणी तलाव तळाला गेले आहेत. त्यात अवघे ७ ते १० टक्के ऐवढेच पाणी शिल्लक आहे. यातूनही बाष्पीभवन सुरू आहे. त्यामुळे शेतीसाठी दूरच, आता जनावरांचा चारा-पाण्यासाठीही पाणी मिळते की नाही, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
सर्वाधिक क्षेत्र पाझर तलावावर
सर्वाधिक क्षेत्र हे पाझर तलावावर अवलंबून आहे. ६९१ पाझर तलावावर १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्याशिवाय सिमेंटच्या १३२४ बंधाऱ्याखाली १२ हजार ५१८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. कोल्हापूर पद्धतीच्या २११ बंधाऱ्यातून ४४६४ हेक्टर, २३९ साठवण बंधाऱ्यामुळे ३९८४ हेक्टर, साठवण ४२ तलावातून ११९२ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळतो. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके आताच संपल्यागत आहेत. काही भागात थोडेफार पाणी आहे, मात्र तेही कितीकाळ टिकेल, याविषयी साशंकता आहे.
आमच्या विभागाअंतर्गत ६९१ पाझर तलाव असून, त्याखाली साधारणतः १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. मात्र बहुतांशी तलाव कोरडे पडले आहेत, काही ठिकाणी तळ गाठला, तर कुठे ७ ते १० टक्के ऐवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची वस्तूस्थिती आहे.पांडुरंग गायसमुद्रे, कार्यकारी अभियंता, मृद-जलसंधारण