Dowry Case Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Dowry Fraud Case: हुंड्यासाठी 11 तोळे सोने अन् लाखो रुपये उकळले; आणखी पैशांची मागणी करत लग्न मोडले

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पंढरपूरच्या चार जणांविरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नगर: लग्नाचे आमिष दाखवून हुंड्यापोटी तब्बल ११ तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये उकळल्यानंतर, आणखी पैशांची मागणी पूर्ण न केल्याने ठरलेले लग्न मोडल्याची घटना अहिल्यानगरात समोर आली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची फसवणूक करून मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून चार जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित निवृत्ती जावळे, अलका निवृत्ती जावळे, आकांक्षा समर्थ कोकाटे, समर्थ कोकाटे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत निवृत्ती जावळे (रा. पंढरपूर) याच्याशी अहिल्यानगरमधील एका तरुणीचा विवाह ठरला होता. लग्नाच्या बोलणीदरम्यान अभिजितची आई अलका निवृत्ती जावळे, आकांक्षा समर्थ कोकाटे आणि समर्थ कोकाटे यांनी हुंड्याची मागणी केली होती.

त्यानुसार मुलीच्या कुटुंबीयांनी साखरपुड्यासाठी ५ लाख रुपये खर्च केले व नवरदेवाच्या कपड्यांसाठी २५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर लग्नाचे धार्मिक विधी करण्याचे कारण सांगून संशयित आरोपींनी लग्नाआधीच मुलीच्या वडिलांकडून ११ तोळे सोन्याचे दागिने स्वतःकडे जमा करून घेतले.

लग्न काही दिवसांवर आले असताना, आरोपी अभिजित व त्याच्या नातेवाईकांनी फर्निचर, भांडी व वरातीच्या खर्चासाठी आणखी ५ लाख रुपयांची मागणी केली. पीडित कुटुंबीयांनी असमर्थता दर्शविली असता, आरोपींनी अरेरावीची भाषा वापरत लग्न मोडल्याचा सांगावा धाडला. लग्नपत्रिका वाटून झालेल्या असताना ऐनवेळी लग्न मोडल्याने आणि ११ तोळे सोने परत न केल्याने अखेर पीडितेच्या आईने वरील आरोपींविरोधात पोलिसांत फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT