Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी चुरशीने मतदान; आज निकालाचा फैसला!

३,८३७ पैकी ३,८०९ मतदारांनी बजावला हक्क; सोसायटीच्या चारही मतदारसंघांत १०० टक्के मतदान, दुपारी दोनपर्यंत निकाल अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघाच्या चार जागांसह शेतीपूरक आणि पाच राखीव अशा दहा जागांवर सोमवारी (दि. २) चुरशीने मतदान झाले. सोसायटीच्या चारही मतदारसंघात 100 टक्के मतदान झाले. इतर सहा जागांवरही सस्पेन्स वाढविणारा मतांचा टक्का दिसला. एकूण 3837 पैकी 3809 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता निकालाकडे लक्ष लागले आहे. कोणत्या तालुक्यात कोणी धरले... कोणी सोडले... याचीच चर्चा उशिरापर्यंत सुरू होती. आज मंगळवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन, दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.

जिल्हा बँकेची 21 जागांची निवडणूक ही सहकार आणि परिवर्तन पॅनलने प्रतिष्ठेची बनवली होती. यापूर्वी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे सत्तेचा कलही स्पष्ट झालेला आहे. मात्र तरीही उर्वरित 10 जागांवरील लढती लक्षवेधी बनल्या होत्या. अकोल्यात सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे विरुद्ध आमदार किरण लहामटे, राहुरीत आ. प्राजक्त तनपुरे विरुद्ध सत्यजित कदम, कर्जतमध्ये ज्योती शिंदे विरुद्ध तुषार पिसाळ आणि पारनेरमध्ये खा. नीलेश लंके विरुद्ध राहुल शिंदे अशा सोसायटीच्या चार जागांवर चुरशीने मतदान झाले.

याशिवाय, ओबीसी मतदारसंघात कारभारी जावळे विरुद्ध जालिंदर वाकचौरे, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून वैभव पिचड विरुद्ध प्रशांत लोखंडे, भटक्या-विमुक्तमध्ये गणपत सांगळे विरुद्ध ऋषिकेश ढाकणे आणि महिला राखीवच्या दोन जागांवर अनुराधा नागवडे आणि संगीता वाघ यांच्या विरुद्ध हर्षदा काकडे, संध्या महाडुंळे व अपक्ष सुवर्णा पाचपुते अशी लढत झाली. काही ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याच्या चर्चेने सस्पेन्स वाढला आहे. आज (मंगळवारी) मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मतमोजणी कक्षात 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली. सीसीटीव्हीसह कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

पहिल्या फेरीतच सोसायटीचा फैसला

मतमोजणीची पहिली फेरी ही राहुरी, पारनेर, अकोले, आणि कर्जत सोसायटींची होणार आहे. साधारणतः तासाभरात निकाल जाहीर होईल. त्यानंतर शेतीपूरक मतदारसंघाची 14 टेबलवर मतमोजणी होईल. तो निकाल जाहीर झाल्यानंतर ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त तसेच दोन महिला राखीव या मतदारसंघांतील मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. साधारणतः दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मतपेट्या स्टाँगरूममध्ये!

दरम्यान, मतदानानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतपेट्या अमरज्योत मंगल कार्यालयातील मतमोजणी केंद्रात आणण्यात आल्या. व्हिडीओ चित्रीकरणानंतर त्या सुरक्षित स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या. तत्पूर्वी, खा. लंके समर्थकांनी स्ट्राँगरूमची पाहणी केली. या वेळी ॲड. राहुल झावरे यांच्यासह कार्यकर्ते तेथे होते. त्यांनी आतील बाथरूमसह खिडक्याही तपासल्या. तसेच ‘स्टाँगरूममधील चित्रीकरण आम्हाला दिसायला हवे,’ अशी मागणीही काही कार्यकर्त्या इंजिनीअरने केली! प्रशासनाकडून घोडेचोर यांनी कार्यकर्त्यांना सर्व माहिती दिली. त्यावर त्यांचे समाधानही झाले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात मतपेट्या स्टाँगरूमपर्यंत नेल्या.

कार्यकर्त्यांचा रात्रभर पहारा!

मतपेटीमध्ये गडबड होऊ नये, या भीतीने खा. लंके समर्थक कार्यकर्ते स्टाँगरूमबाहेर रात्र काढण्याच्या तयारीत होते. रात्री काही कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी झोपण्याचीही व्यवस्था केली होती. या वेळी राहुरीचे सत्यजित कदम यांचे कार्यकर्तेही रात्री स्टाँगरूमबाहेर थांबलेले पाहायला मिळाले. दरम्यान, राहुल शिंदे समर्थकांनीकडून ‘मतपेट्यांना कितीही राखण बसले तरी निकाल बदलणार नाही’, असा दावा केला जात असल्याचे समोर आले.

मतदान फूटू नये म्हणून बुथवरही ‘फिल्डिंग’

पारनेरमध्ये खा. नीलेश लंके आणि राहुल शिंदे यांच्यात हाय-व्होल्टेज लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांनी मतदान फूटू नये, यासाठी टप्प्याटप्प्याने प्रत्येकी चार मतदारांसोबत एका निष्ठावंताला मतदानाला पाठवले जात होते. कर्जतमध्ये विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनीही ज्योती शिंदे यांच्यासाठी आपल्या सहलीवरील मतदारांची सिरीयल लावली होती. त्याचप्रमाणे त्यांनी मतदान घडवून आणले. त्यांनी स्वतःदेखील ठरलेल्या नियोजनानुसार रांगेत येऊन मतदान केल्याचे दिसले. तुषार पिसाळ यांनी ‘तीर्थयात्रा घडलेले’ बहुसंख्य मतदार आमचे असल्याचे सांगत विजयाचा दावा केला आहे.

मतदान केंद्रात चित्रीकरण

मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही एका मतदाराने मतदान करतानाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करून कोणाला मतदान केले, हे बाहेर दाखविल्याचा प्रकार घडला. यावर परिवर्तन पॅनलचे प्रताप ढाकणे यांनी आक्षेप घेतल्याने मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ, वादावादी झाली. वाद वाढत गेल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वातावरण शांत केले. या घटने बाबत संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जाणता राजा मैदानाजवळील मेहेर शाळेत मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी एका मतदाराने इतर पाच जागांवर केलेल्या मतदानाचे चित्रीकरण करून ते बाहेर दाखवले. त्यावर प्रताप ढाकणे यांनी आक्षेप नोंदवला. ही बाब मतदान केंद्र प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांना कळवली. त्यांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संगमनेरच्या सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT