Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी हालचालींना वेग

यशवंतराव गडाखांच्या आवाहनाला सर्वपक्षीय प्रतिसाद; विखे-थोरात-राम शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नगर: सध्या दुष्काळी परिस्थती लक्षात घेऊन जिल्हा बँक बिनविरोध करावी, यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सर्वपक्षीय नेत्यांना साद घातल्यानंतर जिल्हाभरातून त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. कदाचित उद्या-परवाच निवडणूक जाहीर झाल्यानंतर या प्रक्रियेला आणखी गती मिळणार असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात विशेषतः विरोधी कारखानदारांचे नाक दाबण्यासाठी जिल्हा बँकेची सत्ता महत्त्वाची आहे. ती मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नात असतात. 21 संचालक पदासाठी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी 3836 मतदार आहेत. आतापर्यंत डॉ. सुजय विखे पाटील यांनी ज्येष्ठ तथा युवा नेतृत्वाच्या भेटीगाठी, डिनर डिप्लोमसीतून जुन्या-नव्यांचा मेळ घातला आहे, तर स्वतःकडे सध्या कारखाना नसला तरी प्रा. राम शिंदे यांनीही बँकेसाठी साखरपेरणी करून ठेवली आहे.

याशिवाय, बिगरशेती, शेतीपूरक यासह तालुक्याच्या सोसायटी मतदारसंघातील ठरावांचा होमवर्कही त्या त्या इच्छुकांनी पूर्ण केला आहे. त्यांच्या याद्याही तयार आहेत. त्यामुळे कोण बिनविरोध होईल, किंवा कोणाला निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते, याचा अंदाज बांधून तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी परिस्थती आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. निवडणूक लादल्यास जिल्ह्याचे नुकसान होणार आहे. दुष्काळात बँकेवरही आर्थिक खर्च पडणार आहे. हीच दुष्काळी परिस्थिती पाहता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

वेट ॲण्ड वॉच : प्रा. राम शिंदे

जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषतः जिल्हा बँकेच्या कारभारात ज्यांनी योगदान दिले, अशा ज्येष्ठ नेत्यांच्या आपण भेटी घेतल्या होत्या. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस तसेच बँकेबाबत मार्गदर्शन मिळावे, हाच यामागचा हेतू होता. कदाचित, अशा भेटीगाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर घ्यायला हव्या होत्या का, असा मला प्रश्न पडला आहे. माझी जरा घाई झाली की काय असे वाटते. असो, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही बिनविरोधची साद घातली आहे. मला विचाराल तर मीही या विचाराशी सहमत आहे. सर्व पक्षांतूनही यास प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाटतो, असे विधान परिषदेचे सभापती तथा भाजप नेते प्रा. राम शिंदे ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले. यावेळी राजकीय समीकरण कसे असेल, याबाबत छेडले असता, ‘वेट ॲण्ड वॉच’ अशा शब्दात त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला.

विखे-थोरात-शिंदेंना पुढाकार घ्यावा लागेल!

गडाखांच्या बिनविरोध आवाहनाला सर्वपक्षीय प्रतिसाद मिळत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच विधान परिषद सभापती राम शिंदे हेही सहकारातील निवडणुका बिनविरोधसाठी अनुकूल आहेत. त्यामुळे बँकेच्या बिनविरोध प्रक्रियेतही तीन नेत्यांचा शब्द ‘प्रमाण’ असणार हे निश्चित आहे.

निवडणूक कार्यक्रम उद्या लागणार?

अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांना निवडणूक कार्यक्रमाचे वेध लागले आहेत. वाढलेल्या राजकीय घडामोडींवरून कदाचित, दि. 24 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. यात ऐन वेळी बदल झालाच तर दि. 27-28 रोजी हा कार्यक्रम पुढे जाऊ शकतो. असे घडल्यास दि. 2 ते 3 नोव्हेंबर दरम्यान मतदान घेतले जाण्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच बँकेत नवीन संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते. सध्या तरी निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

बिनविरोध का? चर्चा तर होणारच!

निवडणूक बिनविरोध झाली तर वार्षिक 12 हजार कोटींची उलाढाल असलेल्या बँकेचे निवडणूक शुल्क 15 लाख आणि बूथ खर्चासह 10 लाख असे 25 लाख रुपये वाचणार आहेत. 21 पैकी 14 सोसायटी, एक बिगरशेती, एक शेतीपूरक यासह दोन महिला, एक ओबीसी अशा किमान 19 उमेदवारांना जर निवडणुकीला सामोरे जावे लागले तर प्रचार यंत्रणा व अन्य असा एका उमेदवाराचा खर्च बँकेच्या ‘एकूण’ निवडणूक खर्चाइतकाच असू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT