नगर / संगमनेर: लोकसभा, गणेश कारखाना आणि विधानसभा निवडणुकीनंतर टोकाला पोहचलेला थोरात-विखे संघर्ष आता शमताना दिसत आहे. जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी संगमनेरात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात ऐतिहासिक समझोता झाला. बँकेसाठी थोरात हे समन्वयक, तर डॉ. विखे हे सहसमन्वयक असतील. त्यांच्या सोबतीला आता गडाख, घुले, काळे, कोल्हे, तनपुरे, कर्डिले, जगताप, पाचपुते आदी दिग्गज एकत्र आले आहेत. या प्रक्रियेत थोरात-विखे जो निर्णय घेतील, तो मान्य करण्याची सहमती सर्वपक्षीयांनी बैठकीत दर्शवली.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी (दि. २८) सुरू होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या भूमिकांकडे नजरा लागल्या आहेत. यातूनच पॅनल कसा असेल, याविषयीचे आडाखे बांधले जाताना दिसले. यातून बिनविरोधचाही सूर आळवला गेला. यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घ्यावा, अशी सर्वपक्षीयांची अपेक्षा दिसली. डॉ. सुजय विखे पाटील यांनीही थोरातांकडे तशी आग्रही मागणी केली. त्यानंतर रविवारी (दि. २७) सकाळी संगमनेरात थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर बैठक ठरली. त्यासाठी थोरातांच्या कार्यालयातून शनिवारीच सर्व नेत्यांना फोन फिरले.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या आवाहनानंतर, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते आदींनी उपस्थिती लावून बैठकीत भूमिका मांडली. आमदार मोनिका राजळे आणि बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले ऑनलाइन उपस्थित होते. बिनविरोधच्या निर्णयासह थोरात ठरवतील त्या निर्णयास त्यांनी पाठिंबा दर्शविला.
असा ठरला फॉर्म्युला
बँकेच्या संचालकपदाच्या 21 जागा आहेत. यातील एक शेतीपूरक, एक बिगरशेती, दोन महिला, एक ओबीसी, एक अनुसूचित जाती-जमाती, एक विमुक्त जाती, अशा सात जागांबाबत थोरात आणि विखे एकत्रित बसून बिनविरोधसाठी ‘त्या-त्या’ नावांवर निर्णय घेतील. सोसायटी मतदार संघातील 14 जागांसाठी पॅनल तयार केला जाईल. यात जे सोबत येणारच नाहीत, त्यांच्याविरोधात हा पॅनल निवडणूक लढवील, असा निर्णय झाल्याचेही सूत्रांकडून समजले.
थोरात-विखे एकत्र, पण..!
गेल्या अनेक वर्षांपासून थोरात-विखे यांच्यात पारंपरिक संघर्ष आहे. बँकेच्या गेल्या निवडणुकीत तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी भाजपचा स्वतंत्र पॅनल बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी हा प्रयत्न हाणून पाडत 21 पैकी 17 जागा बिनविरोध केल्या. यात पिचड समर्थक सीताराम गायकर, विखे समर्थक अण्णासाहेब म्हस्के यांनाही घेतले होते. मात्र, चार जागांवर एकमत न झाल्याने निवडणूक झाली. त्यानंतर चेअरमन निवडीत थोरातांनी सूत्रे हाती घेत विखेंना दूरच ठेवल्याचे दिसले होते.
‘त्यांना’ निमंत्रण नव्हते?
संगमनेरातील सर्वपक्षीय बैठकीचे प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सभापती राम शिंदे बैठकीला नव्हते. पारनेरचे आमदार काशीनाथ दाते होते; परंतु खासदार नीलेश लंके दिसले नाहीत. श्रीगोंद्यात विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते तसेच राजेंद्र नागवडे होते; मात्र माजी आमदार राहुल जगताप नव्हते. श्रीरामपूरातून आमदार हेमंत ओगले, करण ससाणे असताना, माजी आमदार भानुदास मुरकुटे मात्र दिसले नाहीत. याशिवाय, माजी आमदार वैभव पिचड, प्रताप ढाकणे आदींचीही अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. त्यामुळे संबंधितांना बैठकीचे निमंत्रण नव्हते, की त्यांनीच जाण्याचे टाळले, याविषयी चर्चा सुरू आहेत.
जगताप समर्थक आक्रमक; शिंदे-लंकेंमध्येही चर्चा
संगमनेरातील सर्वपक्षीय बैठकीला माजी आमदार राहुल जगताप यांना निमंत्रण नसल्याचे समजताच, त्यांच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रविवारी सायंकाळी तातडीची बैठक घेवून नाराजी व्यक्त केली. ‘कोणी जाणीवपूर्वक टाळत असेल तर दादा लढायचचं’ अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचे समजले. तर नगर येथील कार्यक्रमातून प्रा. राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांच्यातही संपर्क झाल्याचे समजले.
थोरात दूर करणार राम शिंदेे यांची नाराजी!
बँकेची निवडणूक बिनविरोध करायची असल्यास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनाही विचारात घ्यावे लागणार आहे. मात्र, संगमनेरातील बैठकीला त्यांची अनुपस्थिती दिसल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. असे असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात स्वतः राम शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिंदेंनाही सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे समजते. अकोले, कर्जत-जामखेड, पारनेर आणि श्रीगोंद्यात स्वतंत्र बैठक घेऊन राजकीय तोडगा काढण्याचा निर्णय झाला असून, त्याची जबाबदारी बैठकीत थोरातांवर दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. दरम्यान, ‘पुढारी’ने प्रा. राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की संगमनेरातील बैठकीचे मला निमंत्रण होते; मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बैठकीला उपस्थित राहता आले नाही.