Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधासाठी एकसूत्रीपणाचा अभाव; राम शिंदेंचा आरोप

काहींना विश्वासात घेतले जाते, तर काहींना बाजूला ठेवले जाते; यशवंतराव गडाख यांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी सकारात्मक भूमिकेत आहे. मात्र ज्यांच्यावर बिनविरोधाची जबाबदारी आहे, ते काहींना विश्वासात घेतात तर काहींना बाजुला ठेवतात. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. बँक बिनविरोध होण्याठी आवश्यक एकसुत्रीपणाचा अभाव असल्याचे स्पष्ट करतानाच बिनविरोधासाठी कोणीतरी अडसर निर्माण करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला. बिनविरोधासाठी कोण अडचणीचे ठरते, याचा शोध घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोधसाठी एकसुत्रीपणा दिसत नाहीत. काही उमेदवारांनी वैयक्‍तिकरित्‍या प्रचारदेखील सुरु केला आहे. माघारीसाठी आणखी तीन दिवसांचा अवधी शिल्‍लक आहे. त्‍यामुळे वडिलकीच्‍या नात्‍याने ज्‍येष्‍ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनीच पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, अशी अपेक्षा सभापती शिंदे यांनी व्‍यक्‍त केली.

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, प्रस्‍थापित विरोधात विस्‍थापित असे दोन गट सर्वपक्षीय नेत्‍यांत विभागले गेले आहेत. विस्‍थापित नेत्‍यांची बैठक शनिवारी (दि.१७) विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्‍या उपस्‍थित अहिल्‍यानगरातील शासकीय विश्रामगृहात झाली. खासदार नीलेश लंके, माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रतापराव शेळके, बाळासाहेब हराळ, ॲड. शिवाजीराव अनभुले, सिताराम काकडे, संपतराव म्‍हस्‍के उपस्‍थित होते. बैठकीत बँकेच्‍या निवडणुकीबाबत चर्चा झाली. सभापती शिंदे आणि खासदार लंके या दोघांत बंददाराआड गुप्‍तगू झाले. यावेळी शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष दिलीपसिंग भालसिंग, वसंत लोढा, प्रकाश चित्ते उपस्‍थित होते.

सभापती शिंदे म्हणाले...!

खासदार लंके काही प्रतिनिधींसह भेटले. यशवंतराव गडाख यांनी पहिल्‍यांदा बँकेची निवडणूक बिनविरोध व्‍हावी अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली. त्‍यानंतर बिनविरोधते वारे वाहू लागले आहे. त्‍यांच्‍या आवाहनाला मी सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, ज्‍या नेतृत्‍वांवर बिनविरोधसाठी जबाबदारी आहे. त्‍यांच्‍याकडूनच काहींना विश्‍वासात घेतले जात आहे. काहींना बाजूला ठेवले जात आहे. त्‍यामुळे निवडणूक बिनविरोध होईल की नाही असा संभ्रम जिल्‍हाभरात पसरला गेला आहे. सोसायटी मतदारसंघ वगळता उर्वरित सात मतदारसंघांतील काही वैयक्‍तिक इच्‍छुक उमेदवारांनी प्रचारदेखील सुरु केला आहे. त्‍यामुळे निवडणूक बिनविरोध होणे अवघड दिसते.

विस्थापितांच्या नेतृत्वासाठी राम शिंदेंना गळ

जिल्हा बँक निवठणुकीत प्रस्थापितांनी विस्थापितांना शेवटपर्यंत बेदखल करत सर्व २१ जागांवर ताकदीने तयारी केली आहे. विस्थापितांच्या गटानेही ११ पेक्षा अधिक जागांवर चाचपणी पूर्ण केली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विस्थापित गटाचे नेतृत्व करावे, अशी गळ खासदार नीलेश लंके यांच्यासह सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीत घातल्याचे समजते. बँक बिनविरोधासाठी प्रयत्न करू पण बिनविरोध न झाल्यास सभापती राम शिंदे विस्थापितांच्या पाठीशी ताकद उभी करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहकारातील निवडणुकीच्या नावाखाली भाजपचा गट काँग्रेसशी युती करत असेल, तर दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या एका गटाने एकत्र येऊन तयार केलेल्या विस्थापितांचे नेतृत्व केल्यास वावगे काय, असा सवाल बैठकीत सभापती शिंदे यांनाच करण्यात आला. त्यातूनच प्रा. राम शिंदे यांनी विस्थापितांचे नेतृत्व करावे, असा आग्रह पुढे आला.

थोरातांशी एकदाच संवाद: पालकमंत्र्यांशी अद्याप चर्चा नाही

बँक बिनविरोधाच्‍या पार्‍श्वभूमीवर पहिल्‍यांदा झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात माझ्‍याशी बोलले. त्‍यानंतर अद्याप आमच्‍या दोघांत बोलणे झालेले नाही. निवडणुकीबाबत ५ ऑक्‍टोबरनंतर चर्चा करु, असे आश्‍वासन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जामखेड टंचाई आढावा बैठकीवेळी दिले होते. अद्याप ते काही याविषयी बोलले नसल्‍याचे सभापती शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT