Murder Case Pudhari
अहिल्यानगर

Deulgaon Siddhi Murder Case: देऊळगाव सिद्धीतील मृत्यू नव्हे तर खून; एलसीबी तपासात धक्कादायक उघड

अपघाताचा बनाव फोल; एपीआय गीतेंच्या तपासावर प्रश्नचिन्ह, वाढीव खुनाचे कलम लागू

पुढारी वृत्तसेवा

नगर: देऊळगाव सिद्धी (ता. अहिल्यानगर) परिसरातील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत आरोपींना पाठिशी घालण्याच्या एपीआय गितेंचा भांडाफोड एलसीबीच्या तपासात झाला. पीकअप टेम्पोला धडकून नव्हे तर टेम्पो अंगावर घालून तरुणाचा खून झाल्याचा खरा प्रकार समोर येताच खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा नातेवाईकांनी करूनही एपीआय गीते यांना तो दडपल्याचे आता समोर आले आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रल्हाद गिते यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली अन्‌‍ तपास थांबविला होता. स्थानिक अधिकारी गीते यांच्याकडून न्याय मिळत नसल्याने नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली. चौकशीत तत्कालीन तपासी एपीआय प्रल्हाद गिते यांचे पितळ घडले पडले.

19 जानेवारी 2026 रोजी देवळऊगाव सिद्धी शिवारात कारखान्याजवळ संदीप लगड याचा पिकअपच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. नगर तालुका पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ऋषिकेश बाळासाहेब घिगे, राजेंद्र रमेश घोंगडे हे देऊळगाव सिद्धी येथून पिकअपमधून तांदळी वडगावच्या दिशेने येत असताना संदीप लगडला पिकअपची पाठीमागून धडक बसून अपघात झाला. पिकअपमधील दोघे पसार झाले अन्‌‍ काही वेळाने अन्य लोकांना बोलावून घेतले.

रामदास ताराचंद लगड यांचा संशय फेटाळत त्यांची सदोषमनुष्यवधाची फिर्याद नोंदविली. एपीआय गिते यांनी हा तपास स्वत:कडे घेतला. गिते यांनी ऋषिकेश बाळासाहेब घिगे, राजेंद्र रमेश घोंगडे या दोघांना अटक करून तपासाचा गाशा गुंडळला. घिगे आणि घोंगडे यांनी संदीप लगडचा खून केल्याचा संशय फिर्यादी रामदास ताराचंद लगड व त्यांच्या नातेवाईकांना होता मात्र, तपासी अधिकारी खुनाच्या अनुषंगाने तपास करण्यास तयार नव्हते. फिर्यादी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही तपासी अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही.

अखेर फिर्यादी रामदास लगड यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे न्यायाची मागणी केल्यानंतर एसीबीमार्फत चौकशी सुरू झाली. दरम्यान, तत्कालीन वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांची राहुरी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या तपासात धक्कादायकबाबी समोर आल्या. 19 जानेवारी 2026 मयत संदीप लगड, आरोपी ऋषिकेश घिगे, राजेंद्र घोंगडे हे तिघे देऊळगाव सिद्धी ते वाकळी रस्त्यावरील हॉटेल जंगली येथे जेवण करण्यासाठी बसले होते. त्यांच्या काही तरी वाद झाल्याने मयत संदीप लगड तेथून एकटाच पायी निघून गेला होता. त्याच कारणावरून वरील आरोपींनी संगणमत करून पाठीमागून जावून पिकअप त्याच्या अंगावर घातला आणि त्याला ठार मारले, असे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे करीत आहेत.

अरणगावपाठोपाठ दुसरा कारनामा उघड

अरणगाव येथील एका परप्रांतीय व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाला. मात्र, नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून गुन्हा दडपविला. एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार अर्ज करून त्याचा पाठपुरावा केल्याने खुनाचा गुन्हा उघडकीस आला. आता त्यानंतर पुन्हा देऊळगाव सिद्धी येथील संदीप लगड मृत्यूप्रकरणातही खूनच असल्याचे स्पष्ट झाल्याने एपीआय गिते यांचा दुसरा कारमाना उघड झाला आहे.

अज्ञात वाहनाची धडक दिल्याचे सांगा; गीतेंची धमकी

घटना घडल्यानंतर पोलिसांनी प्रथम खबर घेण्यास टाळाटाळ केली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते अज्ञात वाहनाने धडक दिली असे सांगा अशी धमकीवजा सल्ला देत होते, असा अजब खुलासा फिर्यादी रामदास लगड यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला होता.

एपीआय गिते यांचे निलंबन होणार का?

सोनई येथील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात कुचराई केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांना निलंबित केले. त्यामुळे आता नगर तालुक्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी गंभीर गुन्ह्याचा तपास स्वतःकडे ठेवून तपासात उणिवा ठेवल्याचे स्पष्ट झाले असून, खुनाचे गुन्हे दडपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एपीआय गिते यांचे निलंबन होणार का?अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT