गोरक्ष शेजूळ
नगर: देशातील लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा अर्थात डिलिमिटेशनचा विषय पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक पास झाल्यास महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातही राजकीय गणिते बदलणार आहे. विधेयकातील मतदार संघाच्या 50 टक्के वाढीप्रमाणे नगरमध्ये लोकसभेचा एक, तर विधानसभेचे 6 मतदार संघ वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, 33 टक्के प्रमाणे महिला प्रतिनिधींनाही संधी मिळणार आहे. दरम्यान, नव्या पुनर्रचनेनंतरच त्या त्या मतदार संघातील जिल्ह्यातील दिग्गजांच्या राजकीय वर्चस्वाचाही अभ्यास करता येणार आहे.
महाराष्ट्रात सध्या लोकसभेचे ४८ मतदारसंघ असून, अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी आणि अहिल्यानगर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र, नव्या सीमांकनानंतर जिल्ह्यात तिसरा लोकसभा मतदारसंघ निर्माण होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभेतील सदस्यसंख्या वाढविणे, लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांची पुनर्रचना करणे आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करणे, हे डिलिमेटेशनचे उद्देश आहेत. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
सीमा बदलणार!
सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नव्या सीमांकनात लोकसंख्येचा निकष, भौगोलिक परिस्थिती आणि प्रशासकीय सोयीचा विचार होणार आहे.
नवा मतदारसंघ कुठे ?
जिल्ह्यात तिसरा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्याचा निर्णय झाल्यास त्याचे मुख्यालय कुठे असणार, कोणत्या तालुक्यांचा समावेश होणार, सध्याच्या शिर्डी आणि अहिल्यानगर मतदारसंघांमधील कोणते विधानसभा मतदारसंघ नव्या मतदारसंघात जाणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. उत्तर भागातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि अकोले या भागांचा स्वतंत्र विचार होणार का? अथवा दक्षिण भागातील श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, पारनेर आणि इतर तालुक्यांच्या भौगोलिक रचनेत बदल होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या विधेयकाला पाठींबा दिलाच तर नगर खासदार नीलेश लंके हे ‘एनडीए’ला मतदान करताना दिसू शकतात. ठाकरे सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पूर्वीच ‘एनडीए’सोबत गेलेले आहेत.
लोकसभेत एक, विधानसभेला सहा महिला?
डिलिमिटेशनमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या सीमांकनात नगरमध्ये तीन लोकसभा मतदार संघ तर 18 विधानसभा मतदार संघ पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणीही महिलांना 33 टक्के प्रमाणे लोकसभेच्या एका, तर विधानसभेच्या सहा जागांवर महिला आरक्षण असेल. यामध्ये शालिनीताई विखे, धनश्रीताई विखे, दुर्गाताई तांबे, जयश्री थोरात, सुनीता भांगरे, स्नेहलता कोल्हे, चैताली काळे, अनुराधा आदिक, मंजूश्री मुरकुटे, दीपाली ससाणे, प्रियतमा कदम, उषाताई तनपुरे, शशिकला पाटील, सुनिता गडाख, राजश्री घुले, हर्षदा काकडे, मोनिका राजळे, राणीताई लंके, अनुराधा नागवडे, प्रणोती जगताप, प्रतिभा पाचपुते, यांसह काही नव्या महिलांनाही राजकारणात नेतृत्वाची संधी मिळू शकते.
विधानसभेचेही 18 मतदारसंघ होणार!
डिलिमिटेशन विधेयकामुळे सध्याच्या मतदार संघाच्या तुलनेत 50 टक्के वाढी अंतिम झालीच, तर जिल्ह्यात लोकसभेचा दोनसोबत आणखी एक मतदार संघ वाढू शकतो, त्याचबरोबर विधानसभेचेही 12 ऐवजी सहा मतदार संघ वाढून ती संख्या 18 पर्यंत पोहचणार आहे. सध्याच्या शेवगाव-पाथर्डी, नगर-राहुरी, कर्जत-जामखेड मतदार संघ हे स्वतंत्र होणार आहेत. याशिवाय, श्रीगोंदा, पारनेर, राहाता, कोपरगाव आणि संगमनेरचीही तोडफोड केलेली आहे, त्याची फेररचना होणार आहे. लोकसंख्या आणि भौगोलिक रचनेनुसार कदाचित, संगमनेर उत्त्तर अन् दक्षिण, नेवासा उत्तर अन् दक्षिण, राहुरी, नगर शहर, ग्रामीण उत्तर अन् ग्रामीण दक्षिण तसेच श्रीगोंदा याचा विचार करून असे सहा नवीन मतदार संघ नव्याने होऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र भौगोलिक अन् किती लोकसंख्येनुसार ही रचना केली जाते, यावरच जास्तीत जास्त तीन मतदार संघ वाढणार, की सहा हे अवलंबून असणार आहे.
उत्तरेला दक्षिणेतील ‘राजकीय’ लिमिटेशन!
गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिणेतून जिल्हा विभाजनाची मागणी आहे. कदाचित, डिलिमिटेशनच्या माध्यमातून ती अप्रत्यक्षरित्या काहींची पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची राजकीय ताकद मोठी आहे. मात्र, दक्षिणेतील काही नेत्यांना उत्तरेचा हस्तक्षेप नको आहे. अनेकदा त्यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. त्यामुळे डिलिमिटेशनमुळे नवीन रचना होऊन, उत्तरेतील नेत्यांच्या दक्षिणेतील मतदार संघातील वर्चस्वाला किंबहुना वाढत्या हस्तक्षेपाला कुठेतरी लिमिटेशन येऊ शकते, अशा आशावाद असावा. मात्र पुनर्रचनेनंतर याचे उत्तर मिळणार आहे.