Digital Arrest Scam Pudhari
अहिल्यानगर

Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत ८ लाख ८० हजार उकळले; सायबर पथकाने टोळीला ठोकल्या बेड्या

अहिल्यानगरच्या सायबर सेलची मोठी कारवाई! नगर आणि बीडमधील तिघांना पुण्यातून अटक; आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नगर : ‌‘मनी लाँड्रिंग‌’च्या एका प्रकरणात तुम्ही अडचणीत आला आहात. यामध्ये तुम्हाला डिजीटल अरेस्ट केली जात आहे,‌’ अशी भीती दाखवून, कारवाई टाळण्यासाठी 8 लाख 80 हजार रुपये उकळणाऱ्या टोळीचा अहिल्यानगरच्या सायबर पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणात ज्याच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले, त्याच्यासह अन्य दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सावेडी येथील संदीप हरिभाऊ कुलथे यांना दि. 24 ते दि. 28 ऑक्टोबर 2025 या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने मुंबई सायबर सेलमधून बोलत असल्याचे सांगून वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सॲपद्वारे व्हिडीओ कॉल केले. मनी लॉंड्रिंग, हवाला मनी अँड आयडेटी थेप्ट केसमध्ये आपले नाव आले असून, यात तुम्हाला डिजीटल अटक करण्यात आली आहे, अशी भीती दाखवण्यात आली. तसेच बँक खातेही सील करण्यात येणार आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात त्यांनी कुलथे यांची फसवणूक करताना, त्यांना बँक खाती क्रमांक देऊन त्यावर पैसे पाठविण्याचे सांगितले. कुलथे यांनी 8 लाख 80 हजार रुपये संबंधित बँक खात्यात वर्ग केले. मात्र अजून पैशांची मागणी झाल्यानंतर नातेवाइकांनी ‌‘असा कोणताही प्रकार नसतो, तुमची फसवणूक झाली‌’ हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, कुलथे यांनी नगरच्या सायबर पोलिस स्टेशनकडे धाव घेतली.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सायबरचे पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडे तपास सोपवला. सायबरचे उपनिरीक्षक सुदाम काकडे यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, निळकंठ कारखेले, रावसाहेब हुसळे यांनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास केला. यामध्ये कुलथे यांच्या खात्यातून नेमके कोणाच्या बँक खात्यात पैसे गेले, ही माहिती घेण्यात आली. त्यानंतर धागेदोरे हाती लागत गेले.

आरोपींना खाक्या दाखवताच त्यांनी कुलथे यांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांना दि. 29 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दोन आरोपी नगर जिल्ह्यातील

सायबरच्या तपासात बँक डिटेल्सवरून पारनेर तालुक्यातील भाळवणीचा विजय रंगनाथ चेमटे, नेवासा तालुक्यातील सलाबतपूरचा अक्षय संजय तांबे, तसेच दादेगाव, बीडचा अभिजित अजिनाथ गिते यांची नावे समोर आली. हे आरोपी पुण्यात होते. त्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

आपल्या मोबाईलवर संशयास्पद, अनोळखी लिक ओपन करू नका. अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करू नका. अशा प्रकरणात कोणाची फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर हेल्पलाईन 1930 किंवा 1945 वर किंवा जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क करून तक्रार नोंदवा.
पोलिस निरीक्षक सागर ढिकले सायबर पोलिस स्टेशन, नगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT