

पाथर्डी : पाथर्डी येथे सपकाळ वस्तीवर बांधाच्या वादातून एका विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. नंदा वसंत सपकाळ (वय 45) असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी तिची जाऊ रंभाबाई अशोक सपकाळ, भाया अशोक विश्वनाथ सपकाळ व पुतण्या नवनाथ अशोक सपकाळ यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा भाऊ संजय नवनाथ अकोलकर (रा. डांगेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की नंदा सपकाळ ही आपल्या सासरी नांदत होती. बांधासंदर्भात तिचे जाऊ, भाया व पुतण्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्यात तिला सातत्याने शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या.
मंगळवारी (दि. 25) सकाळी आठच्या सुमारास पुन्हा वाद झाला. सकाळी नंदाचा मुलगा आकाश याने फिर्यादी संजय अकोलकर यांना फोनवर माहिती देत सांगितले, की घरच्यांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून नंदाने शेतातील सामाईक विहिरीत उडी मारली आहे.
त्यानंतर फिर्यादी, त्यांची पत्नी व गावातील काही नागरिक घटनास्थळी धावले. विहिरीत शोध घेतल्यानंतर नंदाला दोरीच्या साह्याने बाहेर काढून पाथर्डी येथे उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नंदाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.