नगर : गुगल मॅपव्दारे सबस्टेशन शोधायचे, परिसरात जाऊन दोन दिवस पाळत ठेवायची, तेथील रस्त्यांची माहिती घ्यायची आणि त्यानंतर रात्री व पहाटे सबस्टेशनमधून कॉपर चोरी करायची, असा मास्टर प्लॅन तयार करून नगरसह तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी आंतरराज्यीय टोळी काल स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. आरोपींनी कॉपर चोरीच्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली.
4 नोव्हेंबर 2025 रोजी 132 के. व्ही. उपकेंद्र खांडके, पिंपळगांव लांडगा येथील कॉपरचे पाईप, बेल्ड कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती. संबंधित अधिकारी अरविंद बडे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॉपर चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस कॉपर चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलिस अंमलदार राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, विष्णु भागवत, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, अमोल आजबे, जालिंदर माने, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांचे पथक तयार करुन कॉपर चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथकाने कॉपर चोरीच्या घटनांची माहिती घेऊन, व्यवसायिक कौशल्याचे आधारे सलग आठ दिवस तपास केला. यातून, बबलु उर्फ हुसेन रेहमत खान, समीम कमरअली खान (दोघेही रा.कडमेडी, मध्यप्रदेश), शकील लईस खान (रा. ग्रामभरोसा,भोपाळ), कासीम इदरीस खान (रा.महाराज खेडी,विदीशा,मध्यप्रदेश), शाहरुख साबीर खान (रा.जिनीया, ता. भोपाळ) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुगल मॅपवर एमएसईबीसब स्टेशन कोठे आहे, याबाबत माहिती घेत दोन दिवस परिसराची रेकी करायचे. रात्री व पहाटेच्या दरम्यान चोरी करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीचा मुद्देमाल घेवुन फरार होत व फक्त कॉपर चोरीच्या उद्देशाने ते महाराष्ट्रामध्ये येत असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींनी खांडके येथील सब स्टेशन, 220 केव्ही कौडगाव, येथील विंड वर्ल्ड लि. कं., यासह शेवगाव, नेवासा, सिन्नर, पारगाव या ठिकाणी असलेले एमएसईबी सब स्टेशनमधुन गुगल मॅपचे लोकेशनचे आधारे कॉपर चोरी केल्याचे सांगितले. आरोपींकडून दीड लाखांची कॉपर पोल, तीन लाखांची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार असा एकुण साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.